पुण्यात भाजपसमोर शिवसेनेला सामावून घेण्याचे आव्हान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 मे 2019

भाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांच्यातील जागा वाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या मनसेची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून राहणार आहे. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना एकत्र आलेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागा वाटपाचा समन्वय कसा साधणार हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे. 

भाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांच्यातील जागा वाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या मनसेची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून राहणार आहे. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना एकत्र आलेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागा वाटपाचा समन्वय कसा साधणार हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे. 

हरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी सहा पुणे लोकसभा मतदारसंघात येतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. दोन वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीतही भाजपनेच एकहाती सत्ता मिळवली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती पुण्यात विधानसभेसाठी मात्र भाजपच्यादृष्टीने डोकेदुखी बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

विद्यमान आमदारांच्या जागांबाबत अदलाबदल होणार का, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी पुण्यातील विधानसभेची कोणतीही जागा घटकपक्षांना द्यावी अशी मानसिकता भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाही. त्यामुळे युतीत जागा वाटपावरूनच ठिणगी पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

२०१४ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध लढले. यावेळी वडगावशेरी, कोथरूड आणि पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. वडगावशेरीत अवघ्या पाच हजार मतांनी सेनेचा पराभव झाला होता. स्वबळावर भाजपला 'काटे की टक्कर' देणाऱ्या शिवसेनेला यावेळी पुण्यात किमान दोन ते तीन जागांची अपेक्षा असणे सहाजिक आहे. किंबहुना याच हेतूने शिवसेनेने लोकसभेत भाजपचे काम केले. अर्थात शिवसेनेच्या या मनसुब्यांना भाजपची कितपत साथ देणार याविषयी साशंकता आहे. 

दुसऱ्या बाजूला विधानसभेतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार हे निश्‍चित आहे. ही आघाडी झाली तर शहरातील जागांची वाटणी निम्मी निम्मी होई. कॉंग्रेसने लोकसभेच्या निकालाची वाट न पाहता शहरात विधानसभा निहाय मेळाव्यांचे नियोजन केले आहे.  

सध्या भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कोथरूड मतदारसंघ २०१४ पूर्वी मात्र शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ होता. त्यामुळे सहाजिकच शिवसेनेचे शहरप्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हा मतदारसंघ पक्षाला मिळावा यासाठी प्रयत्नशील असतील. राष्ट्रवादी येथे कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता असून, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने भाजपमध्ये रस्सीखेच राहणार आहे. 

शिवाजीनगर मतदारसंघातही भाजपची ताकद वाढली आहे. या मतदारसंघात आमदार विजय काळे यांच्यासोबत नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हेही प्रमुख इच्छुक आहेत. लोकसभेत अनिल शिरोळे यांना न मिळालेल्या संधीची विधानसभेत भरपाई होणार काय, याबाबत चर्चा आहे. माजी आमदार विनायक निम्हण हे कोणत्या पक्षाकडून लढणार याचीही उत्सुकता आहे. तर आघाडीच्या जागा वाटपात या जागेवर कॉंग्रेस आग्रही राहणार अशीच चिन्हे आहेत. वडगावशेरीसाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. आमदार जगदीश मुळीक यांच्या बंधूंना स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन या मतदारसंघात मोठा निधी वळवला आहे. या मतदारसंघासाठी शिवसेनेचे सुनील टिंगरे हेही आग्रही राहतील. राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात बापू पठारे यांच्यासह इच्छुकांची संख्या मोठी आहे. पर्वतीमध्ये आमदार माधुरी मिसाळ 'हॅटट्रिक'च्या तयारीत आहेत. या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन तावरे पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेल्याने कॉंग्रेसकडून या जागेची मागणी होईल. 

पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघात समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना सध्यातरी भाजपमधून इतर कोणताही समर्थ पर्याय दिसत नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मिळणारे मताधिक्‍य यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यावेळीही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. युतीचा घटक पक्ष असणारा रिपब्लिकन पक्ष(आठवले गट) ही जागा लढविण्यात इच्छुक असेल. 
गिरीश बापट खासदार झाल्यानंतर कसबा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण हा सध्या चर्चेचा विषय आहे. महापौर मुक्ता टिळक, धीरज घाटे, गणेश बीडकर, हेमंत रासने अशी इच्छुकांची मोठी यादी आहे. बापट यांच्या सूनबाई स्वरदा याही उत्तराधिकारी म्हणून मैदानात उतरतील. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचीच कसोटी लागणार आहे. 

मनसेतून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले नगरसेवक रवींद्र धंगेकर हे यावेळीही इच्छुकांमध्ये आघाडीवर आहेत.  पुण्यात मनसेची ताकद असून मनसेला आघाडीत सामावून घेतले तर कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुण्यात सध्यातरी जागा वाटपाचा उत्तम समन्वय कसा राखला जाणार याचेच आखाडे इच्छुकांकडून बांधले जात आहेत. 

असा आहे राजकीय पट 
- भाजपसमोर शिवसेनेला सामावून घेण्याचे आव्हान 
- कॉंग्रेस आघाडी मनसेला जागा सोडणार काय? 
- कोथरूड, कसब्यात भाजप इच्छुकांची मांदियाळी 
- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधीची शक्‍यता 

 

web tittle- Challenge of accommodating Shivsena before BJP


संबंधित बातम्या

Saam TV Live