शिवसैनिक माझ्यावर नाराज का? माझं काय चुकलं - चंद्रकांत खैरे 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

औरंगाबाद : गेल्या वीस वर्षात चार वेळा खासदार म्हणून जिल्ह्यांमध्ये मी अनेक विकास कामे केली आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून गेलो, हिंदुत्वासाठी सदैव तत्पर राहिलो, तरीही निवडणुकीत काही शिवसैनिकांनी , पदाधिकाऱ्यांनी माझ्या विरोधात काम केले. माझं काय चुकलं , शिवसैनिक माझ्यावर नाराज का आहेत? असा उद्विग्न सवाल शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.

औरंगाबाद : गेल्या वीस वर्षात चार वेळा खासदार म्हणून जिल्ह्यांमध्ये मी अनेक विकास कामे केली आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून गेलो, हिंदुत्वासाठी सदैव तत्पर राहिलो, तरीही निवडणुकीत काही शिवसैनिकांनी , पदाधिकाऱ्यांनी माझ्या विरोधात काम केले. माझं काय चुकलं , शिवसैनिक माझ्यावर नाराज का आहेत? असा उद्विग्न सवाल शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.

औरंगाबाद शिवसेनेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकांत खैरे बोलत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा साडेचार हजार मतांनी पराभव झाला. हा पराभव खैरे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या देखील जिव्हारी लागला. औरंगाबाद येथील शिवसेना शाखेला ३४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खैरे यांनी आपल्या भाषणात मराठवाड्यातील शिवसेनेच्या वाटचालीच्या आठवणींना उजाळा दिला .

ते म्हणाले, "दोनवेळा आमदार, चारवेळा खासदार आणि राज्यात मंत्री म्हणून काम करताना आपण अनेक विकासकामे केली. गोरगरीब , दुःखी-कष्टी लोकांच्या मदतीला कायम धावून गेलो. अनेक सर्वसामान्य शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसे मोठे केले तसेच मीदेखील जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना मोठी केले,  त्यांना पदे दिली .पण त्यांनीच निवडणुकीत माझ्या विरोधात काम केल्याचा आरोप खैरे यांनी केला. खैरे म्हणाले माझ्या पराभवानंतर केवळ जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक शिवसैनिक ,महिला पदाधिकारी अक्षरशः ढसाढसा रडल्या,''

राज्यात माझ्याच पराभवाची चर्चा
राज्यात आज कुणाच्या पराभवाची चर्चा होत असेल तर ती सुशीलकुमार शिंदे यांच्या नाही तर खैरेंच्या पराभवाची होते. माझे काय चुकले ? की ज्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. माझा पराभव झाला याचे दुःख नाही . पण हिंदुत्व हरले याचे वाईट वाटते ज्याने आपल्या आई वडिलांचा मान राखला नाही, त्यांना मारहाण केली. भावाच्या बायकोला छळले, पत्नीला मारहाण केली. अशा माणसाला आपण मदत केली याचे दुःख होते. खैरेंनी काय केले हा प्रश्न मला विचारला जातो? पत्रकारही विचारतात. पण माझा त्यांना सवाल आहे की मी काय केले नाही ? आज नॅशनल हायवे सोलापूर धुळे जळगाव मार्ग माझ्या प्रयत्नामुळे झाला . याशिवाय जो कोणी मदत मागायला आला त्याला सढळ हस्ते मदत केली. अगदी दिल्लीत अमरनाथ, वैष्णोदेवी यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची व्यवस्थ,त्यांच्या अडचणी सातत्याने सोडवल्या. आज हे यात्रेकरू दिल्लीत कुणाकडे जातील हा प्रश्न मला सतावत आहे. मला पराभूत करण्यासाठी ज्यांनी काम केले त्यांनी एकदा 1986 - 88 चा काळ पुन्हा डोळ्यासमोर आणावा,  तुमच्यापैकी अनेकांचा  तेव्हा जन्मही झाला नसेल." असेही खैरे म्हणाले.

मी केंद्रात मंत्री होणार होतो
रझाकारी काय असते हे आम्ही पाहिलेले आहे. त्यांना निकराने लढा दिला,  तुरुंगात गेलो , पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या . तेव्हा कुठे आजची सत्ता दिसते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या शिवसेनेमुळेच आज  हिंदू आणि हिंदुत्व टिकून असल्याचे खैरें यांनी सांगितले. 

भगवा झेंडा उखडून फेकण्याची भाषा करणारे आज निवडून आले आहेत. ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक होती. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही असे पक्षप्रमुखांना सांगितले होते . केंद्रात बहुमताने एनडीएचे सरकार आले असताना मला मंत्रीपद मिळणार होते .त्याचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठी झाला असता, असे सांगतानाच पण निवडणुकीच्या एक वर्ष आधीपासूनच काही नतद्रष्ट माझ्याविरोधात कामाला लागले होते, असा आरोप खैरेंनी केला.

''मला सांगितले असते तर मी स्वतःहून बाजूला गेलो असतो. आज माझा पराभव करून कुणाला फायदा झाला आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.  आज जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा कोणी विचार केला आहे का? जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आपली परिस्थिती वाईट आहे . शहरातील पूर्व - मध्य  मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार निवडून येईल का नाही अशी स्थिती आहे'' असेही खैरे म्हणाले.

''तिकीट मागणारे अनेक आहेत, पण परिस्थिती काय आहे याची जाणीव कोणाला आहे का? असा सवालही खैरे यांनी उपस्थितांना केला. जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेची ताकद आणि वैभव आणायचे असेल तर मतभेद , गटबाजी बाजूला सारून एकदिलाने काम करण्याची गरज आहे. हिंदुत्वसाठी, हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र आले तरच हे शक्य आहे, असाही दावा त्यांनी केला

काय चुका झाल्या असतील नसतील, त्याबद्दल मी घरोघरी जाऊन माफी मागायला देखील तयार आहे .पण हे सगळं हिंदुत्वासाठी. लोकसभा निवडणुकीत काय झाले? कुणी माझ्या विरोधात काम केले?  हे आता मनात ठेवणार नाही. ज्यांनी विरोधात काम केले त्यांना मी तर माफ केलेच , पण देवानेही ही त्यांना माफ करावे अशी मी प्रार्थना करतो, असे सांगत खैरेंनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना टोला लगावला.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live