कर्जदाराची पत्नी आणि मुलाला सावकाराने पेटवले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मे 2019

चंद्रपूर - कर्जाने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना मंगळवारी चंद्रपुरात घडली. यात मुलगा तीस टक्के, तर पत्नी साठ टक्के होरपळले आहेत. या दोघांवरही स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चंद्रपूर - कर्जाने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना मंगळवारी चंद्रपुरात घडली. यात मुलगा तीस टक्के, तर पत्नी साठ टक्के होरपळले आहेत. या दोघांवरही स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चंद्रपुरातील सरकारनगरात राहणारे हरिश्‍चंद्र हरिणखेडे हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू यांच्याकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यातील दोन लाख रुपयांची परतफेड हरिणखेडे यांनी यापूर्वीच केली आहे. उर्वरित रकमेतील ६० हजार रुपये आज देण्याचे ठरले होते. ते घेण्यासाठी आज जसबीर भािटया हा हरिणखेडे यांच्या घरी गेला तेव्हा हरिणखेडे यांचा मुलगा पीयूष आणि पत्नी कल्पना घरी होते. हरिश्‍चंद्र या वेळी स्वच्छतागृहात गेले होते. दुसरीकडे जसबीर आणि हरिणखेडे कुटुंबीयांत शाब्दिक खडाजंगी उडाली तेव्हा जसबीरने आपल्या गाडीतून पेट्रोल काढून अचानकपणे पीयूष आणि कल्पना यांच्यावर शिंपडले व पेटवून दिले. यात जसबीरही किरकोळ भाजला; पण तो तेथून पळून गेला. या घटनेमुळे आरडाओरडा झाला तेव्हा शेजारचे धावून आले आणि त्यांनी या दोघांना वाचविले. घरात लागलेली आगही विझविण्यात यश आले.

हे सर्व प्रकरण कर्जाने घेतलेल्या पैशाच्या वादातून घडले. हरिणखेडे यांनी कर्जाचे अर्धेअधिक पैसे परत केले. पण, तरीही जसबीरने त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, जसबीर भाटीया या अवैधरीत्या सावकारी करतो. या घटनेत होरपळलेल्या पीयूष हरिणखेडे याच्यावर स्थानिक पोद्दार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भाटीया किरकोळ भाजला. तोही याच रुग्णालयात उपचार घेत आहे. पैसे देण्याचे कबूल केल्यानंतरही त्याने हा जीवघेणा हल्ला केल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा हरिणखेडे कुटुंबाने व्यक्त केली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Debtor Wife Son Fire Money Lender Crime


संबंधित बातम्या

Saam TV Live