#ISRO | आता आमच्यापुढे मानवी 'गगनयान' मोहिमेचं आव्हान - के. सिवन

#ISRO | आता आमच्यापुढे मानवी 'गगनयान' मोहिमेचं आव्हान - के. सिवन

भुनवेश्‍वर : "भारताची महत्त्वाकांक्षी "चांद्रयान-2' मोहीम 98 टक्‍के यशस्वी ठरली आहे. आता आमच्यापुढे 'गगनयान'चे आव्हान आहे, '' असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी स्पष्ट केले. 

'चांद्रयान-2'चा अंतिम व महत्त्वाचा टप्पा "विक्रम' लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा होता. 7 सप्टेंबरला रात्री दीडच्या सुमारास ही प्रक्रिया सुरू झाली. पण, चंद्रापासून केवळ 2.1 किलोमीटर उंचीवर असतानाच "विक्रम'चा "इस्रो'च्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. लॅंडर व त्यातून बाहेर पडणाऱ्या "प्रज्ञान' रोव्हरचा कार्यकाळ 14 दिवसांचा होता. या दिवसांमध्ये "विक्रम'शी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे अथक प्रयत्न "इस्रो'ने केले. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा'ची मदत घेण्यात आली. पण, आज 14 दिवस पूर्ण झाल्याने लॅंडरशी संपर्क साधण्याच्या आशा आता मावळल्या आहेत. 

'इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्‍नॉलॉजी'च्या (आयआयटी) आठव्या पदवीदान समारंभासाठी सिवन हे आज भुवनेश्‍वरमध्ये होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, "विक्रम' लॅंडरशी संपर्क साधण्यास अद्याप आम्हाला यश आलेले नाही. हा प्रकल्प विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा दोन भागांत विकसित करण्यात आला होता. यात वैज्ञानिक उद्दिष्ट गाठण्यात आम्हाला पूर्णपणे यश आले, तर तंत्रज्ञानातील यशाचा वाटा 98 टक्के आहे. "चांद्रयान-2'चा ऑर्बिटर अगदी व्यवस्थित व योग्य दिशेने काम करीत आहे. या ऑर्बिटरमध्ये सुमारे आठ उपकरणे आहेत. प्रत्येक उपकरणाचे काम वेगवेगळे आहे. नियोजनानुसार सर्व उपकरणांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. म्हणजेच, ही मोहीम 98 टक्के यशस्वी झाली आहे. आता आमचे सर्व लक्ष "गगनयान' मोहिमेकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

'चांद्रयान-2'च्या लॅंडरचा संपर्क का तुटला, याच्या कारणांचे विश्‍लेषण राष्ट्रीय पातळीवरील उच्चस्तरीय समिती करीत आहेत. या समितीत शिक्षणतज्ज्ञ आणि "इस्रो'च्या तज्ज्ञांचा समावेश आहे. "विक्रम' लॅंडरमध्ये काय त्रुटी राहिली किंवा चूक झाली, हे समजल्यानंतर लगेचच पुढील कार्यवाही करण्यात येथील, असे सिवन यांनी या वेळी सांगितले. 

दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या भागात "विक्रम' लॅंडर आदळला; तेथे पुढील 14 दिवस सूर्यप्रकाश पडणार नाही. या काळात चंद्राच्या तापमानात घट होऊन ते उणे 183 अंश सेल्सिअसपर्यंत पोचेल. अशा गोठवणाऱ्या तापमानात लॅंडरचे इलेक्‍ट्रॉनिक भाग खराब होऊ शकतात. जर "विक्रम'मध्ये "रेडिओआयसोटोप हीटर' हे उपकरण असले असते, तर लॅंडर शाबूत राहू शकले असते, असे सांगण्यात येते. 

मानवी 'गगनयान' मोहीम 
भारताच्या "गगनयान' या मानवाला अंतराळात पाठविण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी केली होती. "गगनयान' ही भारताची पहिलीत मानवी अंतराळ मोहीम आहे. दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या या योजनेत तीन अंतराळवीरांना घेऊन "इस्रो'चे एक अंतराळयान 2021 मध्ये उड्डाण करेल. "इस्रो' आणि भारतीय हवाईदल या प्रकल्पावर संयुक्तपणे काम करीत आहेत. या मोहिमेसाठी हवाईदलाने आपल्या वैमानिकांमधून निवड सुरू केली आहे. पहिल्या यादीत 25 वैमानिकांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. मोहिमेसाठी ज्या वैमनिकांची निवड होईल; त्यांना "इस्रो' अंतराळवीरांचे प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण रशियात देण्यात येईल. 

आमचे लक्ष आता "गगनयान' मोहिमेकडे लागले आहे. पुढील वर्षी ही मोहीम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी आम्ही विविध पातळीवर काम करीत आहोत. पण, सर्वांत आधी लॅंडरबाबत नक्की काय घडले, हे आम्हाला समजून घ्यावे लागेल. त्यालाच सध्या आमचे प्राधान्य आहे. 
- के. सिवन, "इस्रो'चे प्रमुख

Web Title: Chandrayaan-2 is 98 percent successful Gaganyaan our next priority says Isro chief K Sivan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com