आज चांद्रयान 2 अवकाशात झेपावणार; काऊंटाउन सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

चेन्नई : मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेले 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात झेपावणार असून, त्यासाठीची उलटगणती रविवारी (ता. 21) संध्याकाळी सहा वाजून 43 मिनिटांनी सुरू झाल्याची माहिती 'इस्रो'कडून देण्यात आली. 

चेन्नई : मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेले 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात झेपावणार असून, त्यासाठीची उलटगणती रविवारी (ता. 21) संध्याकाळी सहा वाजून 43 मिनिटांनी सुरू झाल्याची माहिती 'इस्रो'कडून देण्यात आली. 

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की तांत्रिक दोष आढळून आल्यानंतर आम्ही 'चांद्रयान- 2' मोहिमेची उलटगणती थांबविली होती. यानातील तांत्रिक दोष शोधून ते दूर करण्यात आले. त्यानंतर आम्ही पुन्हा अनेकदा चाचण्या घेतल्या, त्यामुळे आता पुन्हा कुठलाही दोष निर्माण होण्याची शक्‍यता नाही. 

तब्बल 45 दिवस प्रवास केल्यानंतर 'जीएसएलव्ही मार्क- 3' हा प्रक्षेपक 'चांद्रयान- 2'ला चंद्राच्या कक्षेत पोचविणार आहे. अखेरच्या 15 मिनिटांमध्ये 'चांद्रयान- 2' हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर घिरट्या घालणार असून, त्यानंतर 'प्रग्यान' ही बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे, असे सिवन यांनी स्पष्ट केले. 

'चांद्रयान 2'साठी 22 जुलै हाच मुहूर्त का? 
पहिले पाऊल चंद्रावर पडून 50 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याच दरम्यान भारताच्या 'चांद्रयान 2'च्या उड्डाणाची नवीन तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निमित्ताने चंद्राचे अनेक नवीन पैलू मानवापुढे येतील. या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुरेश नाईक यांच्याशी साधलेला संवाद... 

आपले 'चांद्रयान 2' हे 15 जुलैला अवकाशात झेपावणार होते. पण, उड्डाणासाठी 56 मिनिटे बाकी असताना ही मोहीम स्थगित करण्यात आली. आता 22 जुलै रोजी चांद्रयान 2 आकाशात झेपावणार आहे. पण, 22 जुलैचा मुहूर्त चुकला असता तर मात्र आपल्याला सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागली असती. चंद्र आणि पृथ्वी यातील अंतर हे त्यामागचे एक कारण आहे. हे अंतर सतत कमी- जास्त होत असते. हे अंतर जास्त असेल तर त्यासाठी इंधनाची गरज वाढते. दुसरे कारण, चंद्रावर सोडण्यात येणारा 'रोव्हर' चौदा दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणे आवश्‍यक आहे. तो सौरऊर्जेवर काम करतो. त्यामुळे 22 जुलै ही तारीख चुकली असती, तर सप्टेंबरपर्यंत परत तशी "विंडो' मिळाली नसती. 

अग्निबाणाच्या दोन बाजूचे बूस्टर हे सॉलिड स्टेजचे असतात. मधली स्टेज असते, त्यात द्रवरूप इंधन असते. त्याच्या वरचा तिसरा टप्पा हा क्रायोजिनक आहे. या क्रायोजिनक स्टेजमध्ये दोन टाक्‍या आहेत. एक टाकी आहे ती द्रवरूप ऑक्‍सिजनची, तर दुसऱ्या टाकीत द्रवरूप हायड्रोजन असतो. द्रवरूप हायड्रोजन हे इंधन आहे. द्रवरूप ऑक्‍सिजन हे "ऑक्‍सिडायजर' आहे. या दोघांच्या ज्वलनाने अतिशय "हॉट गॅसेस' तयार होतात. ते अग्निबाणाच्या मागच्या नळकांड्यातून वेगाने बाहेर पडतात. त्यातून प्रक्षेपकाचे उड्डाण होते. यासाठी क्रायोजेनिक इंजिन वापरतात. 

'चांद्रयान 2'च्या मोहिमेसाठी दोन्ही टाक्‍यांमध्ये द्रवरूप इंधन भरण्यात आले. हे इंजिन काम सुरू करताना प्रक्षेपक पृथ्वीपासून शंभर किलोमीटरच्या पलीकडे गेलेले असते. तेथे गुरुत्वाकर्षण नसते. त्यामुळे या द्रवरूप इंधनाचे वहन होण्यासाठी त्यावर हेलियम गॅस भरला जातो. त्याच वेळी अग्निबाणातील इंधनगळती लक्षात आली, त्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. अशीच समस्या "चांद्रयान 1' उड्डाणाच्या वेळी दोन तास आधी लक्षात आली होती. पण, त्या वेळी तातडीने दुरुस्ती करून ठरलेल्या वेळी उड्डाण झाले. परंतु या वेळी मोहिमेची व्याप्ती मोठी आहे. या वेळी अग्निबाण मोठा आहे, त्यामुळे कोणताही धोका न पत्करता त्यांनी ही मोहीम स्थगित केली. त्यातील दोष दूर केले आणि आता 22 जुलै ही उड्डाणाची तारीख निश्‍चित केली आहे. 

Web Title: Chandrayaan 2 to be launched on July 22 announces ISRO


संबंधित बातम्या

Saam TV Live