यासिन भटकळ याच्यावरील आरोप निश्चित; पुढील सुनावणी 15 जूनला

यासिन भटकळ याच्यावरील आरोप निश्चित; पुढील सुनावणी 15 जूनला

पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक, कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ उर्फ शिवानंद याच्यावर सोमवारी आरोप निश्चित करण्यात आले. 

भटकळ याच्यावर आरोप निश्चिती करायची असल्याने त्याला न्यायालयात हजर करावे ,अशी नोटीस दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) देण्यात आली होती. त्यानुसार भटकळ याला तिहार जेलमधून पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आजचे न्यायालयीन कामकाज झाल्यानंतर त्याला पुन्हा दिल्लीला नेण्यात आले आहे. चार्जेस वाचून दाखविल्यानंतर भटकळ याने मी निर्दोष असल्याचे सांगितले. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालायत या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 

भटकळ हा हैदराबाद येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होता. त्यामुळे त्या खटल्याची सुनावणी पूर्ण होईलपर्यंत त्याला इतर कुठल्या खटल्यासाठी नेण्यात येऊ नये, असे निर्देश हैदराबाद न्यायालयाने केले होते. त्यामुळे 2014 साली जर्मन बेकरी प्रकरणातील दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही या खटल्याची सुनावणी सुरु झाली नव्हती. हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने भटकळ याला शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यावर जर्मन बेकरी प्रकरणात आरोप निश्चिती करण्यात आले आहेत.  त्यामुळे आता या खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे. यापुढील सुनावणी सुरक्षेच्या कारणास्तव तिहार जेलमधून विडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. मात्र व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी घेण्यास बचाव पक्षाचे वकील झहीरखान पठाण यांनी विरोध केला आहे. पुढील सुनावणी 15 जूनला होणार आहे. 

13 फेब्रुवारी 2010 ला सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी कोरेगावपार्क येथील जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 17 व्यक्ती मृत्यूमुखी तर एकूण 56 लोक गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये 5 व जखमींमध्ये 10 परदेशी नागरिकांचा समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान, एटीएसने केलेल्या तपासात गुन्ह्यात वापरलेल्या स्फोटामध्ये आरडीएक्स या स्फोटकाचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले होते. जर्मन बेकरी या गुन्ह्याच्या ठिकाणी यासीन भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा केल्यापासून तो फरारी होता. इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ यांनी संयुक्तपणे कारवाई करताना यासिनला नेपाळच्या सीमेवरुन सौनाली या गावातून अटक करण्यात आली होती. त्याचा ताबा 13 मार्च 2014 ला एटीएसकडे सोपविल्यानंतर त्याला याप्रकरणी 14 मार्च 2014  ला पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दरम्यान त्याला प्रत्यक्ष रित्या किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सींगनेही न्यायालयात हजार करण्यात आले नव्हते.

या कलमांतर्गत झाले आरोप निश्चित : 
भादवि कलम 360, 302, 325, 326, 324, 427, 120 (ब) , 467, 468 474, 153 ( अ) यूएपीए कायदा कलम 10, 13, 16, 21. यासह देशभरात झालेल्या अनेक बॉम्बस्फोटाच्या खटल्यांत तो आरोपी आहे.

Web Title: marathi news German Bakery blast case charges against Yasin Bhatkal have been fixed

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com