प्रियांका गांधींना अध्यक्षपद नको! - चेतन भगत

प्रियांका गांधींना अध्यक्षपद नको! - चेतन भगत

त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपली राजकीय मते स्पष्ट मांडतो. भारतीय लेखक सहसा राजकीय भूमिका घेत नाहीत, व्यक्त होत नाहीत, असा आरोप सातत्याने होतो. चेतन भगत मात्र याला अपवाद आहे. समाजमाध्यमे, तसेच स्तंभलेखनातून तो स्वतःची राजकीय मते सातत्याने मांडत असतो. त्यामुळे त्याच्याशी राजकीय विषयांवरच गप्पा मारण्याचा बेत आखला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्याने आपली मते दिलखुलासपणे मांडली. 

प्रियांका गांधींना अध्यक्षपद नको! 
लोकशाही देशात विरोधी पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे लेखक म्हणून मला मनापासून वाटते, असे सुरवातीलाच सांगत तो म्हणाला, कॉंग्रेसची सध्या दारुण अवस्था झाली आहे. मात्र तरीही कॉंग्रेस हाच मोठा देशव्यापी विरोधी पक्ष आहे. त्यामुळे तो वाढणे गरजेचे आहे. पण त्यासाठी कॉंग्रेसनेही तत्काळ पावले टाकली पाहिजेत. सर्वप्रथम राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडले पाहिजे. त्यांना आता पुरेशी संधी देऊन झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष दोन निवडणुका लढला. दोन्ही वेळी पक्ष पराभूत झाला. सध्याच्या राजकारणात प्रतिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात राहुल फार मागे पडतात. त्यामुळे पक्षाने तत्काळ पक्षाची धुरा अन्य व्यक्तीकडे द्यायला हवी. खरे तर कॉंग्रेस व राहुल गांधींनी याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे मत चेतन भगत याने मांडले. 

ब्रिटिशांच्या काळात कॉंग्रेसचा जन्मच लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठीच झाला होत,÷िअसे सांगत तो म्हणाला, ""आता पक्षाने जनभावना ऐकली पाहिजे. यंदा पक्षाची मतेही फार वाढली नाहीत. अशा वेळी राहुल यांना आणखी संधी देणे योग्य नाही. त्यापेक्षा पक्षाने नवा चेहरा शोधला पाहिजे. लोकांनी त्यांना नाकारलेय ही वस्तुस्थीती लक्षात घेतली पाहिजे. राहुल यांना प्रियांका गांधी याही पर्याय होऊ शकत नाहीत. त्या एकाच नाण्याच्या दुसरी बाजू ठरतील. पक्षात अनेक अनुभवी, तरुण चेहरे आहेत. अमरिंदरसिंग यांच्यासारखे अनुभवी, तर सचिन पायलटसारखा कार्यक्षम नेता पक्षाकडे आहे. खरे तर सचिन पायलटसारख्या हुशार, तरुण नेत्याकडे पक्षाने आता सूत्रे सोपवायला हवीत. पायलट यांना देशातील ग्रामीण, तसेच शहरी प्रश्नांची उत्तम जाण आहे. त्यांनी आपले नेतृत्वगुणही सिद्ध केले आहेत. शिवाय तरुण असल्याने त्यांच्याकडे वेगळे "व्हिजन'ही आहे. 

मोदींबद्दल जनतेला विश्‍वास वाटतो. 
मोदी यांच्या विजयाचे विश्‍लेषण करताना तो म्हणाला, ""काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत. एखाद्या अभिनेत्याला जसे प्रचंड फॅन-फॉलोअर असतात, त्याचप्रमाणे मोदींचा करिष्मा सर्व थरांत इतका कसा याचे वर्णन करता येत नाही. पूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व थरांतील लोकांना माहिती होते. आता तसेच मोदींच्या बाबतीत झाले आहे. देशात कोठेही जा, मोदींचेच नाव ऐकू येत होते. विरोधकांकडे सांगण्यासारखेच फार काही नव्हते. केवळ मोदींना विरोध हा काही निवडणुकीचा अजेंडा असू शकत नाही. कोणतीच व्यक्ती कधीच परफेक्‍ट नसते. मोदींच्याही काही बाबी चुकीच्या असू शकतात. पण ते चोवीस तास काम करतात, ते काही तरी बदल घडवून आणतील असा विश्‍वास आजही लोकांना वाटतो. "मन की बात'सारख्या कार्यक्रमातून त्यांनी हा विश्‍वास निर्माण केला. कॉंग्रेस यात कमी पडली. सत्ता येईल असे त्यांच्या नेत्यांनी गृहीत धरले. त्यामुळे लोकांनी उमेदवारांकडे न पाहता मोदींकडे पाहात भाजपला मते दिली.'' 

जातीपातीची गणिते मोडीत निघाली 
मोदी यांनी जातीपातीची गणिते मोडीत काढली, हे एक यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असल्याचे सांगत चेतन म्हणाला. भाजपला मुस्लिमांची फार मते मिळाली नाहीत. पण जातीपातीची सारी गणिते मोदींच्या नेतृत्वापुढे गळून पडली. उत्तर प्रदेशात दोन मोठे पक्ष एकत्र आले म्हणजे त्या जातींची मते त्यांना असे जे काही बोलले गेले तसे प्रत्यक्षात घडले नाही. "महागठबंधन'च्या रुपाने अखिलेश यादव आणि मायावतींनी तसा प्रयत्नही केला. पण त्यांना यश मिळाले नाही. जातीपेक्षाही देश मोठा आहे, हे मतदारांनी या निकालातून दाखवून दिले. भविष्यकाळासाठी हे चांगले लक्षण आहे, असे विश्‍लेषण चेतन मांडतो. 

भारतीयांना धर्मापेक्षा राष्ट्रवाद प्रिय 
राष्ट्रवाद हा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा वापरला गेला त्यावर बोलताना चेतन म्हणाला, ""भारतीय समाजाला कट्टर हिंदुत्व मनापासून आवडत नाही. भारतीय लोक धर्मापेक्षा देशाला म्हणजेच राष्ट्रवादाला जास्त महत्त्व देतात. खरे पाहिल्यास कॉंग्रेसला राष्ट्रवाद नवा नाही. त्यातूनच कॉंग्रेसचा जन्म झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने तीन युद्धे जिंकली आहेत. पण या वेळी त्यांचे सारेच चुकले. कॉंग्रेसला आता बिगरधर्मी राष्ट्रवाद अंगिकारण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे लोकांना हा राष्ट्रवाद समजावून सांगणारा नेता पक्षाकडे हवा.'' 

सोशल मीडिया "उजवीकडे' 
सोशल मीडियाच्या प्रभावाबाबतच्या प्रश्‍नावर चेतनने वेगळ्या मुद्याकडे लक्ष वेधले. तो म्हणाला, ""प्रामुख्याने इंग्रजी माध्यमात लिहिणाऱ्या मंडळींचे लेखन डाव्या विचारांकडे झुकणारे असते. त्याउलट परिस्थिती सोशल मीडियात पहायाला मिळते. सोशल मीडियात बहुतांश लोक उजव्या विचारांकडे झुकलेले दिसतात. त्याचे प्रत्यंतर निवडणूक निकालांत पहायला मिळाले. केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगात हे चित्र पहायला मिळते. त्यामुळेच अमेरिका, तुर्कस्तानापासून अनेक देशांत उजव्या विचारांची सरकारे सत्तेवर आली आहेत.''

Web Title: Chentan Bhagat writes about Congress president post and Gandhi family

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com