चीनमध्ये सर्वात आधी महिलेला कोरोनाची लागण झाली आणि...

साम टीव्ही
सोमवार, 30 मार्च 2020

चीनच्या वुहानमधून बाहेर पडलेला कोरोना व्हायरस जगभरात पसरलाय. कोरोनाच्या पहिल्या रूग्णाबाबत चीनच्या दाव्यात प्रचंड विसंगती आहे. आता आम्ही तुम्हाला त्या महिलेबद्दल सांगणार आहोत. जी चीनच्या वुहानमध्ये पहिली कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळली होती. 

चीनमधलं वुहान शहर...हे तेच शहर आहे जिथं कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. कोरोनामुळे चीनभोवती संशयाचं धुकं वाढलंय. चीन जगापासून काही गोष्टी लपवत असल्याचा आरोपही होतोय. आता मुद्दा आलाय तो चीनमधील पहिल्या कोरोना रूग्णाचा...
डेली मेलच्या रिपोर्टनुसार चीनमधल्या माध्यमांच्या हाती लागलेल्या काही दस्तऐवजांनुसार सगळ्यात आधी कोरोनाची लागण वुहानच्या सी फुड मार्केटमधील महिलेला झाली होती. 

वेई गुईजियान असं या महिलेचं नाव आहे. 11 डिसेंबरला तिला सर्दी-ताप आला होता. मात्र इंजेक्शन आणि औषधं घेतल्यानंतरही तिची प्रकृती सुधारली नाही. दरम्यानच्या काळात ती चार ते पाच दिवस मार्केटमध्ये मासळी विकत राहिली. या काळात अनेक लोकांचा तिच्याशी संपर्क आला. तब्येत जास्त बिघडल्यानंतर तिला वुहानच्या युनियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारानंतर ती बरी झाली. 

 मात्र चीननं या पहिल्या रूग्णाबाबत कुठेही अधिकृतपणे वाच्यता केलेली नाही. कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्यानंतर हा व्हायरस समुद्री प्राण्यांच्या माध्यमातून आल्याचा दावा चीनकडून करण्यात आला. त्यानंतर चीननं वुहानचं मच्छिमार्केट काही काळासाठी बंद केलं. आता यातला महत्वाचा मुद्दा हाच आहे की चीनमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण नेमका केव्हा आढळला? कारण चीनी मीडियातील दस्ताऐवज आणि चीन सरकारनं केलेला दावा यात प्रचंड तफावत आहे. 

कारण चीनी माध्यमांच्या वृत्तानुसार वेई गुईजियान ही चीनच्या मच्छिमार्केटमधील पहिली कोरोना रूग्ण होती. तर तिथल्या दस्तऐवजांनुसार एका 70 वर्षांच्या व्यक्तीला कोरनाची सर्वात आधी लागण झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या व्यक्तीमध्ये 1 डिसेंबरपासूनच कोरोनाची लक्षणं दिसत होती. विशेष म्हणजे या व्यक्तीचा वुहानमधल्या सी फूड मार्केटशी कोणताही संबंध नव्हता. 

तर साउथ चाइना मॉर्निंग पोस्टनं कोरोना वायरसची पहिला केस 17 नोव्हेंबरला समोर आल्याचं म्हटंलय. चीनी अधिकाऱ्यांनी मात्र 7 डिसेंबरला पहिला कोरोना रूग्ण आढळल्याचं म्हंटलंय. चीनमधील सरकारी दस्तऐवज, अधिकारी आणि तिथल्या माध्यमांनी केलेले दावे यातली तफावत पाहता चीन जगापासून काहीतरी लपवतंय असं म्हणण्याला निश्चितच वाव आहे. जर चीन खरोखरच जगापासून लपवाछपवी करत असेल तर हे निश्चितच चीननं जगाविरूद्ध छेडलेलं हे एक जैविक युद्ध म्हणता येईल. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live