चिनी ड्रॅगनची वळवळ सुरूच, भारत आणि चीनच्या जवानांमध्ये पुन्हा झटापट

चिनी ड्रॅगनची वळवळ सुरूच, भारत आणि चीनच्या जवानांमध्ये पुन्हा झटापट

चीनची खुमखुमी काही केल्या कमी होत नाहीये..लडाखमधल्या पँगाँग लेकजवळ चीनी सैन्यानं पुन्हा एकदा आगळीक केलीय. त्यामुळे भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झटापट झालीय. 

एलएसीवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. लडाखमध्ये पँगाँग लेकजवळ भारत आणि चीनी सैन्य पुन्हा एकदा आमने सामने आलं. दौन्ही सैन्यात जोरदार झटापट झाली. चीनी सैन्य घुसखोरीच्या प्रयत्नात असताना भारतीय जवानांनी त्यांना रोखलं. त्यातूनच हा प्रकार घडलाय. एकीकडे एलएसीवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ब्रिगेडियर लेव्हलवर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे चर्चेआडून चीन घुसखोरीचा कुटिल डाव आखतोय. खरं तर मागील बैठकीत दोन्ही देशांमध्ये समझौता देखील झाला होता. मात्र वर्चस्ववादीची चीनची खुमखुमी जराही कमी झालेली नाही. त्यामुळेच लडाखमध्ये चीन वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र भारतीय सैन्यानंही ड्रॅगनला चोख प्रत्युत्तर दिलंय. 

 दरम्यान लडाखमधील तणवाचा परिणाम इथल्या जनजीवनावर झालाय. श्रीनगर-लेह हायवे सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आलाय. पॅगाँग लेकजवळील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतंय. चिनी सैन्याच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय. 

 या झटापटीनंतर सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या आपल्या शब्दावर ठाम आहेत असं भारतीय लष्करानं म्हंटलंय. मात्र त्याचबरोबर आम्ही आमच्या भूमीचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहोत असंही लष्करानं चीनला ठणकावलंय. विशेष म्हणजे 15 जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे जवान आमने सामने आले होते. ज्यात 20 भारतीयांना वीरमरण आलं. तर भारतीय जवानांनी चीनच्या 40 हून अधिक सैनिकांना यंमसदनी धाडलं. त्यानंतर चर्चेनं तोडगा काढण्यासाठी भारत सातत्यानं प्रयत्नशील आहे. मात्र चीन पँगाँग लेक परिसरावर कब्जा करू पाहतोय हे सॅटेलाईट इमेजेसवरून स्पष्ट झालंय. काही दिवसांपूर्वीच सीडीएस बिपीन रावत यांनी सैन्यदल सज्ज असल्याचं सांगत चीनला इशारा दिला होता. त्यातूनही चीन युद्धाची खुमखुमी दाखवत असेल तर भारतीय जवानाही ड्रॅगनच्या पिल्लावळीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com