चीनमधून येतंय आणखी एक संकट, हजारो लोक नव्या व्हायरसच्या विळख्यात

साम टीव्ही
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020
  • सावधान...चीनमध्ये नवा व्हायरस 
  • हजारो लोक नव्या व्हायरसच्या विळख्यात
  • चीनमधून येतंय आणखी एक संकट 

कोरोनाच्या संकटानं सारं जग हैराण आहे. अशातच चीनमधून एक चिंताजनक बातमी येतीय. चीनमधील हजारो लोक एका नव्या आजारानं त्रासले आहेत. ब्रुसे लोसिस असं या आजाराचं नाव आहे. काय आहे हा नेमका आजार..पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

ज्या चीनमधून कोरोना जगभरात वाऱ्यासारखा पसरला त्याच चीनमधून जगासाठी पुन्हा धोक्याची घंटा वाजतीय. तिथं आता एका नव्या आजारानं डोकं वर काढलंय. या आजाराचं नाव आहे, ब्रुसेलोसिस. उत्तर-पश्चिम चीनमधील हजारो लोक ब्रुसेलोसिस या एका जीवाणूजन्य आजारानं संक्रमित झाले आहेत. गेल्या वर्षी एका जैवऔषधनिर्मिती कंपनीतून हा बॅक्टेरिया लिक झाला होता. गान्सु प्रांतातील लांझोउ या राजधानीच्या शहराच्या आरोग्य आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रुसेलोसिस आजाराचे  3 हजार 245 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत.
 

काय आहे ब्रुसेलोसिस ?
ब्रुसेलोसिस हा एक घातक आजार असून, गाई आणि म्हशींमध्ये प्रामुख्यानं हा आढळून येतो. आणि त्यांच्याकडून माणसांमध्ये संक्रमण होतं. बाधित जनावराचं कच्चं दूध प्यायल्यानं किंवा त्याचं चामडे काढताना हाताला असलेल्या जखमेचा थेट संबंध आल्यास ब्रुसेला हा जीवाणू माणसाच्या शरीरात शिरकाव करतो. ताप, थंडी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा ही आजाराची मुख्य लक्षणं आहेत.

चीनचं अधिकृत प्रसारमाध्यम असलेल्या ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, 24 जुलै 2019 ते ऑगस्ट 2020 या काळात झोंग्मु लांझाउ बायोलॉजिकल फार्मास्युटिकल कंपनीनं जनावरांच्या वापरासाठी तयार करण्यात येत असलेल्या लस उत्पादन प्रक्रियेत कालबाह्य झालेले जंतूनाशक वापरले. त्यामुळे उत्पादन आंबवण्याच्या टाकीमधून वाया जाणार्‍या गॅसचं अपूर्ण निर्जंतुकीकरण झाले.

आंबवलेले द्रव वाहून नेताना वाया जाणारा गॅस जीवाणूयुक्त एरोसोल तयार करतो आणि उत्पादन कालावधी दरम्यान या प्रदेशातील वार्‍याची दिशा उत्तर-पश्चिम अशी होती. त्यामुळे या जीवाणूचे संक्रमण झाल्याचं सांगण्यात आलंय. हा आजार किती घातक आहे याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण मिळालेलं नाही. असं असलं तरी कोरोनाप्रमाणे याही आजाराकडे दुर्लक्ष करून चालता येणार नाही..
 


संबंधित बातम्या

Saam TV Live