पाथरी या साईंच्या जन्मस्थानाच्या विकासासाठी 100 कोटींचा विकास आराखडा - सीएम

पाथरी या साईंच्या जन्मस्थानाच्या विकासासाठी 100 कोटींचा विकास आराखडा - सीएम

शिर्डी : "मराठवाड्यातील पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान आहे. त्याच्या विकासासाठी शंभर कोटींचा विकास आराखडा तयार केला. लवकरच त्याचे भूमिपूजन करू,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले. त्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे, तर पाथरीच्या ग्रामस्थांनी त्याचे समर्थन केले आहे. या वादात शिर्डी ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेण्यासाठी पंधरा दिवसांत बैठक घेण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दर्शविली आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"साईबाबांनी आपल्या हयातीत जन्मस्थानाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे पाथरीचा उल्लेख साईंचे जन्मस्थान असा करू नये, त्यास आमचा तीव्र विरोध आहे. वेळ पडल्यास आम्ही आंदोलन करू,'' असा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी दिला आहे. दुसरीकडे, "आमच्याकडे पुरावे आहेत. त्या आधारे आम्ही हा दावा करीत आहोत. बाबा येथे जन्मले नाहीत, तर मग कुठे जन्मले हे सांगा,'' अशी भूमिका पाथरीच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यांना तेथील लोकप्रतिनिधींचे पाठबळ आहे.

"संशोधक वि. बा. खेर यांनी साई जन्मभूमीबाबत वीस वर्षे संशोधन केले. त्याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. 'भक्तिसारामृत'सारखे ग्रंथ व साईंच्या समकालीन संतांचेदेखील तसे म्हणणे आहे,'' असा दावा पाथरीचे ग्रामस्थ करीत आहेत. साई संस्थानाचे माजी विश्‍वस्त सीताराम धानू हे पाथरी येथील साई मंदिराचे अध्यक्ष आहेत. या मंदिराच्या विकास आराखड्यासाठी तेथील लोकप्रतिनिधी, विधान परिषदेतील 'राष्ट्रवादी'चे आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश वरपूडकर व खासदार बंडू जाधव आदींनी पुढाकार घेतला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे शिर्डी ग्रामस्थांची भूमिका समजावून घेतील. आम्ही शिर्डी ग्रामस्थांचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले आहे. आमचा दावा योग्य ठरेल, असा विश्‍वास शिवसेनेचे कमलाकर कोते यांनी बोलताना व्यक्त केला.

तेथे सारे उत्सव शिर्डीसारखेच!

वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या, पाथरी येथील साईमंदिरात शिर्डी येथील साईसमाधी मंदिराप्रमाणे नित्याच्या आरत्या व उत्सवांचे आयोजन केले जाते. वार्षिक उत्पन्न सुमारे बारा ते पंधरा लाख रुपये आहे. एसटी महामंडळाने पाथरी ते शिर्डी अशी बससेवाही सुरू केली आहे.

Web Title -  cm uddhav thackeray hear views shirdi residents about saibaba birthplace

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com