पुढचे 4 दिवस थंडीचा जोर वाढणार ... काळजी घ्या!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 जानेवारी 2020

पुणे - यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्र पुणेकरांनी शुक्रवारी अनुभवली. अवघ्या चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा ३.९ अंश सेल्सिअसने घसरला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत ८.२ अंश सेल्सिअस तापमान शिवाजीनगर येथील वेधशाळेत नोंदले गेले. येत्या दोन दिवसांमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार असून, किमान तापमान ८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.  

पुणे - यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्र पुणेकरांनी शुक्रवारी अनुभवली. अवघ्या चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा ३.९ अंश सेल्सिअसने घसरला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत ८.२ अंश सेल्सिअस तापमान शिवाजीनगर येथील वेधशाळेत नोंदले गेले. येत्या दोन दिवसांमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार असून, किमान तापमान ८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.  

पुण्यात गुरुवारी सकाळी शिवाजीनगर किमान तापमान सरासरीपेक्षा १.१ अंश सेल्सिअसने वाढले होते. ते १२.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले; पण त्यानंतर पुढील चोवीस तासांमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने झपाट्याने किमान तापमान कमी झाले. पाषाण येथे ८.९; तर लोहगाव येथे १०.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. 

पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण, पावसाच्या तुरळक सरी, कमी दाबाचे क्षेत्र यामुळे किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले नव्हते. शुक्रवारी सकाळी प्रथमच किमान तापमानाचा पारा दहा अंशांपेक्षा कमी नोंदला गेला. या हिवाळ्यात आतापर्यंत १ जानेवारीला १०.८ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा कमी झाला होता; पण शुक्रवारी सकाळी अचानक तापमानात वेगाने घट झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले. 

दिवसाही स्वेटर
शहर आणि परिसरात दिवसभर गार वारे वाहत होते. त्यामुळे किमान तापमान सरासरीपेक्षा १.९ अंश सेल्सिअसने कमी होऊन २७.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दिवसभर स्वेटर, जर्किन असे उबदार कपडे घालून पुणेकर दैनंदिन कामे करत असल्याचे चित्र दिसत होते. सकाळच्या सत्रात शाळेत जाणारी मुले थंडीने कुडकुडली होती; तर दुपारी शाळा सुटल्यानंतर मैदानावर ती उन्हात बसल्याचे दिसत होते. सकाळी नऊपर्यंत थंडी होती. त्यामुळे दुचाकीवरून सकाळी कार्यालयात जाणारे कर्मचारी हातमोजे, जर्किन, कानाला पट्टी घालून प्रवास करत होते.   

पुण्यातील थंडी
शिवाजीनगर    ८.२ 
पाषाण    ८.९ 
लोहगाव    १०.२
(आकडे अंश सेल्सिअसमध्ये)

थंडीचा अंदाज
  शनिवार (ता. १८), रविवार (ता. १९) ः आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे. किमान तापमान ८ अंश सेल्सिअस नोंदले जाईल. 
  सोमवार (ता. २०) ः आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. 

पुढील दोन दिवस काही भागांत थंडीची लाट कायम राहील; पण त्यानंतर किमान तापमानाचा पारा अंशतः वाढेल. आकाश निरभ्र असल्याने आणि महाराष्ट्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता ओसरल्याने थंडी वाढली.
- डॉ. अनुपम काश्‍यपी, हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान विभाग

Web Title: Cold wave in Pune


संबंधित बातम्या

Saam TV Live