जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीचे सर्वंकष मूल्यांकन व्हावे

रवि पत्की
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

ता थोडा दुसरा मुद्दा विचारात घेऊ.भारतीय भारतीय उपखंडातील  कुठल्याही फलनदाजाने फलंदाजीत विक्रम प्रस्थापित केले की SENA देशात त्याची कामगिरी काय ही बाब विचारात घेतली जाते.(South Africa,England, New Zealand, Australia ह्या देशांना क्रिकेट च्या भाषेत SENA देश म्हणतात)ह्या देशातील खेळपट्ट्या फास्ट बॉलर्सला पोषक असतात

इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन ने काल कसोटी सामन्यात 600 विकेट्स पूर्ण केल्या. कसोटीत 600 विकेट्स घेणारा तो पहिलाच फास्ट बॉलर ठरला. बाकी सगळे 600 विकेट क्लब वाले स्पिन्नर्स आहेत (मुरलीधरन,वॉर्न,कुंबळे)
दृष्ट लागावी असे लाईन आणि लेंथ वर नियंत्रण,आऊट आणि इन अशा दोन्ही स्विंग वर हुकमत,रिव्हर्स स्विंगचे कौशल्य, असा परिपूर्ण फास्ट बॉलर म्हणजे जेम्स अँडरसन. बॉलिंग चे पाठय पुस्तक कोळून प्यायलेला आणि स्वतः च्या विचाराने बॅट्समनला आधी सॉर्ट आऊट करून नंतर आऊट करणारा असा हा बुद्धी आणि कौशल्य यांचं बेमालूम संयुग असलेला फास्ट बॉलर. त्याने घेतलेल्या विकेट्स ची गुणवत्ता पाहिली की त्याचा मोठेपणा जाणवतो.कॉट बिहाइंड,पायचित, बोल्ड हे प्रकार बॉलरचा स्तर दाखवते.तसेच त्याने अनेक वेळा बाद केलेले सर्वोत्तम फलनदाज पाहिले(सचिन,पॉंटिंग,द्रविड, संगकारा,कोहली वगैरे) की त्याची महती पटते. सामन्याच्या पहिल्या डावात जसा फलनदाचा स्कोर सामन्याला वळण देतो तसेच गोलनदाजाने पहिल्या डावात किती आणि किती लवकर विकेट्स काढल्या ते ही महतवाचे असते. अँडरसन या बाबतीतही उजवा ठरतो.

आता थोडा दुसरा मुद्दा विचारात घेऊ.भारतीय भारतीय उपखंडातील  कुठल्याही फलनदाजाने फलंदाजीत विक्रम प्रस्थापित केले की SENA देशात त्याची कामगिरी काय ही बाब विचारात घेतली जाते.(South Africa,England, New Zealand, Australia ह्या देशांना क्रिकेट च्या भाषेत SENA देश म्हणतात)ह्या देशातील खेळपट्ट्या फास्ट बॉलर्सला पोषक असतात त्यामुळे स्पिन्नर्सला मदत करणाऱ्या खेळपट्टयांवर धावा करणारे भारतीय उपखंडातील फलनदाज SENA देशात कशी कामगिरी करतात हे पाहिले जाते.त्याच नियमाने जेम्स अँडरसन ने भारतीय उपखंडातिल खेळपट्टयांवर काय कामगिरी केली आहे हे पाहणे सुद्धा आवश्यक आहे. उपखंडातील देशांना आपण PIBS म्हणू(पिब्स)पाकिस्तान,इंडिया,बांगलादेश,श्रीलंका.ह्या चार देशांपैकी बांगलादेश आणि पाकिस्तान ह्या दोन देशात अँडरसन कसोटी खेळलेला नाही.पाकिस्तान चे सामने अमिरात (emirates) मध्ये होत असल्याने तो तिथे खेळला आहे. भारतात 10 कसोटीत 26 विकेट्स त्याने काढल्या आहेत.त्यापैकी 2012 च्या कोलकाता कसोटीत त्याची मॅच विंनिंग कामगिरी होती. सचिन,कोहली,धोनी,युवराज ह्या मुख्य फलनदाजाना सह त्याने 6 विकेट्स काढल्या आणि विजयात मोक्याची कामगिरी केली. तसेच 2006 मध्ये वानखेडेवर सचिन आणि द्रविडला स्वस्तात घेतले.तो सामना सुद्धा इंग्लंड ने जिंकला. म्हणजे भारतातिल 10 कसोटीत एक विजयात सिंहाचा वाटा आणि एकात सिंहाच्या बछड्याचा वाटा असा दिड विजय त्याने मिळवून दिला असे म्हणू. त्याचा भारतातील प्रति विकेट स्ट्राइक रेट 71.50 चा राहिला.(इंग्लंड मध्ये 89 कसोटीत त्याचा स्ट्राईक रेट 50.23 आहे आणि 384 विकेट्स आहेत) श्रीलंकेत 6 कसोटीत 12 विकेट्स.स्ट्राईक रेट 85.33. एका कसोटीत 4 विकेट्स घेऊन विजयात वाटा उचलला. पाकिस्तान विरुद्ध अमिरातीत 6 कसोटीत 28 विकेट्स.मिसबाह,युनूस,अझर अली सारखे मोठे फलनदाज बाद केले.पण इंग्लंड ला एकही विजय मिळाला नाही. त्यामुळे   उपखंडातील तीन ठिकाणी मिळून  एकूण 22 कसोटीत 66 विकेट्स .स्ट्राइक रेट 71.91.(इंग्लंड मधला स्ट्राईक रेट 50.23). 

इंग्लंड मधली मॅचच्या संपूर्ण वेळात असलेली ढगाळ हवा,वारा, भेळ घेऊन खायला मांडी घालून बसावे असे वाटावे इतके सारसबागे एव्हढे खेळपट्टीवरचे गवत, भुंग्यासारखा अचानक कधीही दिशा बदलणारा duke चा चेंडू ह्या सर्व पोषक वातावरणाचे व्यासपीठ जरी मिळाले तरी एका गुणी नटाने प्रत्येक शो ला दिलखेच अदाकारी पेश  केल्याबद्दल त्याचे कौतुक व्हायलाच हवे. त्या outswingers ने दिलेल्या आनंदाच्या क्षणांचे मोल करताच येत नाही. सगळ्याच गोष्टी आकड्यात पहायच्या नसतात पण ग्रेट,GOAT(Gretest Of All Time) वगैरे लेबले लावताना जरा पॉज घ्यायला हवा. इंग्लंडचे क्रिकेट पंडित  उपखंडातील खेळाडूंचे विश्लेषण करताना जसा दीर्घ पॉज घेतात तसाच अगदी दीर्घ नाही तरी थोडा आताही घेतील अशी आशा करू.

    


संबंधित बातम्या

Saam TV Live