चांगली बातमी! कोरोनाचे रुग्ण जितके वाढतायत तितकेच लवकर बरेही होतायत...

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 एप्रिल 2020

कोरोना रुग्णांचे नवनवे आकडे ऐकून घाबरलेल्या राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणि घरी गेलेल्यांच्या संख्येने शुक्रवारी शंभरी ओलांडली असून, पुणे, मुंबईसह राज्यातील 117 रुग्ण बरे झाले आहे. परिणामी, आतापर्यंत कोरोनापासून बरे झालेल्यांची संख्या एक हजाराच्या घरात पोचली आहे.

 कोरोना रुग्णांचे नवनवे आकडे ऐकून घाबरलेल्या राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणि घरी गेलेल्यांच्या संख्येने शुक्रवारी शंभरी ओलांडली असून, पुणे, मुंबईसह राज्यातील 117 रुग्ण बरे झाले आहे. परिणामी, आतापर्यंत कोरोनापासून बरे झालेल्यांची संख्या एक हजाराच्या घरात पोचली आहे. दुसरा दिलासा म्हणजे, गेल्या चार दिवसांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या थोडीशी कमी होऊन शुक्रवारी दिवसभरात 394 रुग्ण सापडले आहेत. 

दुसरीकडे मात्र, विविध शहरांमधील 18 कोरोनाबाधित मरण पावले आहेत. तर राज्यभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 6 हजार 817 इतकी झाली आहे. मरण पावलेल्यांचा आकड्याने तीनशे टप्पा पूर्ण केला आहे. आतापर्यंत एका दिवसांत 65 रुग्ण बरे झाले होते; शुक्रवारी मात्र सर्वाधिक 117 जणांना घरी सोडले आहे. मृतांमध्ये मुंबईतील 11, पुणे पाच आणि मालेगावांतील दोघांचा समावेश आहे. त्यात 12 पुरुष आणि सहा महिला आहेत. गंभीर बाब म्हणजे, नऊ मृत व्यक्ती या 40 ते 60 पेक्षा अधिक वयोगटातील आहेत. मृतांना उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हदया आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

राज्यभरातून आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 1 लाख 2 189 पैकी 94 हजार 485 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यातील 6 हजार 817 जण कोरोनाबाधित आहेत. या कोरोनाबाधितांपैकी 957 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यभरातील 28 लाख 88 हजार लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. ज्या लोकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आहे; अशा सुमारे 1 लाख 19 हजार जणांना घरीच विलग ठेवण्यात आले आहे. तर 8 हजार 814 जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

शुक्रवारी दिवसभरातील नवे रुग्ण - 394 
एकूण रुग्ण - 6 हजार 817 
मृत - 18 
एकूण मृत - 301 


संबंधित बातम्या

Saam TV Live