कोरोनामुळे शिक्षणाचे नुकसान टाळण्यासाठी नामी उपाय

साम टीव्ही
गुरुवार, 11 जून 2020
  • कोरोनाचा शालेय शिक्षणाला फटका
  • चांदवडच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची युक्ती
  • शालेय शिक्षणाचा ‘चांदवड पॅटर्न’

कोरोनाची सद्यस्थिती पाहता राज्यातील शाळा कधी सुरू होतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी चांदवडच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी नामी उपाय शोधलाय.

कोरोनाच्या संकटामुळे मागच्या इयत्तेतील दोन महिने वाया गेले. शिवाय नव्या शैक्षणिक वर्षातही शाळा कधी सुरू होतील याचा नेम नाही..ही बाब लक्षात घेत चांदवडचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र निकम यांनी तंत्रज्ञानाची मदत घेतलीय. चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतल्या 100 शिक्षकांच्या मदतीनं त्यांनी पहिली ते सातवीच्या  विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओ लेक्चर्सची निर्मिती
केलीय. 
15 मार्चपासून शिक्षक आणि विद्यार्थी घरातच अडकून पडल्याने त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्यांचं मन आणि लक्ष अन्य बाबींकडे वळणे आवश्यक होतं. त्यामुळे शिक्षकांच्या फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग करून भविष्यात ऑनलाईन अध्यापनाची वेळ आल्यास पहिल्या दिवसापासून आपण सज्ज असावे यासाठी शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आलीय. 

65 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्यात येतील. बहुतांश ग्रामपंचायतींनी विद्यार्थ्यांसाठी वाय-फायची सुविधाही उपलब्ध करून दिलीय. तर वाडी वस्तीवर राहणाऱ्या तसंच इंटरनेटची सुविधा नसलेल्या उर्वरित 35 टक्के विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळेतच शिक्षण दिलं जाणार आहे. शिवाय प्रत्येक इयत्तेसाठी शिक्षकांचा स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलाय. प्रत्येक ग्रुपसाठी स्वतंत्र समन्वयक नेमण्यात आलेत. तर शिक्षकांच्या एका स्वतंत्र टीमवर अन्य शिक्षकांना तांत्रिक सहाय्य करण्याची जबाबदारी देण्यात आलीय.

त्यामुळे शाळा सुरू होण्याबाबत अनिश्चितता असली, तरी किमान चांदवडपुरता तरी हा प्रश्न सुटलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live