पतंजलीचं कोरोनावरील 'कोरोनिल' ठरणार रामबाण? 7 दिवसांत 100 टक्के रुग्ण बरे झाल्याचा  दावा

साम टीव्ही
मंगळवार, 23 जून 2020
  • पतंजलीकडून कोरोनावरील 'कोरोनिल' लॉन्च
  • 'कोरोनिल' कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा
  • 7 दिवसांत 100 टक्के रुग्ण बरे झाल्याचा  दावा

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर  बाबा रामदेव यांच्या पतंजलींनं आयुर्वेदिक औषध कोरोनिल लाँच केलंय. कोरोनिल कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा रामदेव बाबांनी केलाय.

सध्या आख्खं जग कोरोनाच्या विळख्यात आहे. कोरोनावर लस,औषध तयार केल्याचा अनेक देशांनी दावा केला मात्र आतापर्यंत ठोस अशी लस ,औषध शोधण्यात कोणालाही यश आलेलं नाही. पण यामध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं बाजी मारलीय. पतंजलीनं कोरोना विषाणूवर कोरोनिल हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केलंय. कोरोनिल हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केलाय. कोरोनिलची चाचणी २८० जणांवर करण्यात आली, यातील तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले  तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केलाय.

बाबा रामदेव यांनी दिलेल्या माहिती नुसार,  कोरोनिलमध्ये गिलोय, अश्वगंधा, तुळशी, स्वासारी रस आणि अणु तेलाचं मिश्रण आहे. कोरोनिलमधील अश्वगंधा कोविड -१९ चे रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन शरीराच्या अँजिओटेन्सीन-कन्व्हर्टींग एंजाइमला मिळू देत नाही. म्हणजेच कोरोना मानवी शरीराच्या आरोग्य पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याच वेळी, गिलोग कोरोना संक्रमणास प्रतिबंध करतं. तुळस कोरोना विषाणूच्या आरएनएवर हल्ला करते आणि त्यांना वाढण्यास प्रतिबंध करते.
पतंजली श्वसारी वटीच्या गोळ्यांचीही विक्री करेल. श्वसरी रस जाड श्लेष्मा तयार होण्यास प्रतिबंधित करते.शिवाय फुस्फुसात होणारी सूज कमी करते.

पतंजली कोरोनिल हे औषध लवकरच बाजारात विक्रीसाठी आणणार आहे..त्यानंतरच हे औषध किती प्रभावी ठरतंय ते स्पष्ट होईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live