डीएसकेंना पत्नीसह दिल्लीतून अटक; पुणे पोलिसांची कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज (शनिवार) पहाटे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.

दिल्लीतील डीएमआर सिएट हॉटेलमधून या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. कॉल रेकॉर्डवरून माग काढत पोलिसांनी यांना दिल्लीतून अटक केली. डीएसके यांचा जामीनअर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला होता.

मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज (शनिवार) पहाटे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.

दिल्लीतील डीएमआर सिएट हॉटेलमधून या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. कॉल रेकॉर्डवरून माग काढत पोलिसांनी यांना दिल्लीतून अटक केली. डीएसके यांचा जामीनअर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला होता.

आपल्या मालमत्तांची किंमत हजारो कोटी रुपये असल्याचे पोकळ दावे डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी केले. त्यांनी न्यायालयास गृहीत धरून फसवणूक केली. न्यायालयाचा विश्‍वासघात केल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळता कामा नये, असे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने शुक्रवारी कुलकर्णी यांना अटक न करण्याचे हंगामी संरक्षण काढून घेतले होते. त्यांच्याविरुद्ध अटकेची किंवा अन्य कारवाई करण्यास पोलिस मुक्त आहेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती. अखेर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. 

डीएसके व त्यांची पत्नी हेमंती यांनी अडीच हजार गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. हे पैसे उभे करण्यासाठी आपल्या काही मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. मात्र, त्या मालमत्ता सध्या त्यांच्या ताब्यात नसल्याचे पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात सांगितले. हे सर्व पैसे आपण देऊ, असे आश्‍वासन डीएसके यांनी दिल्याने उच्च न्यायालयाने त्यांना अटक न करण्याचा हंगामी आदेश नोव्हेंबर महिन्यात दिला होता. मात्र, त्यासाठी न्यायालयात तातडीने 50 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश डीएसकेंनी पाळला नाही. हजारो कोटी रुपये मूल्य असलेल्या आपल्या काही मालमत्ता बुलडाणा अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडे तारण ठेवून शंभर कोटी रुपयांची व्यवस्था होईल, असे त्यांच्या वतीने गेल्या सुनावणीदरम्यान सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात या मालमत्ता दुसऱ्याच बॅंकेकडे गहाण असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. डीएसकेंनी दाखवलेली दुसरी जमीनही प्रत्यक्षात आरक्षित सरकारी जागा आहे, असेही पोलिसांनी दाखवून दिल्यावर न्यायालय संतप्त झाले. 

हा प्रकार धक्कादायक आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळावेत, या हेतूने आम्ही डीएसकेंना अटकेपासून संरक्षण दिले होते. मात्र, त्यांनी वेळकाढूपणा करून न्यायालयाचा विश्‍वासघात केला. त्यामुळे त्यांना दिलेले संरक्षण काढून घेण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

मालमत्तांचीही पडताळणी 
डीएसके यांच्या मालमत्तांची पडताळणी करण्यासाठी व्यावसायिक तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्या 300 मालमत्ता आहेत. ग्राहकहित संरक्षण आणि ठेवीदार कायद्याअंतर्गत (एमपीडीए) या मालमत्ता जप्त करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. यास मान्यता मिळाल्यानंतर डीएसकेंच्या मालमत्तांवर टाच येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


संबंधित बातम्या

Saam TV Live