VIDEO | लग्नाळू पोरांनो, ही बातमी पाहाच! नवरदेवांना गंडवणारी सुंदर मुलींची टोळी सक्रीय

भूषण अहिरे
सोमवार, 9 मार्च 2020

तुम्ही जर तुमच्या मुलाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी जात असाल. तर ही बातमी आवर्जून वाचा. नवरी मुलगी दाखवून मुलाकडच्यांना लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार सर्रास वाढू लागलेत. विशेष करून धुळ्यात, असे प्रकार घडतायेत. 

लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन. लग्न म्हणजे दोन कुटुंबाना जोडणारा सोहळा. पण लग्नाचं नाव काढली की धुळ्यातल्या नवरदेवांना मात्र घाम फुटतोय. कारण इथं लग्नाच्या नावावर नवरदेवाच्या कुटुंबाला लुटण्याचे प्रकार वाढू लागलेत. नवरदेवाला फसवण्याच्या दोन घटना इथं घडल्यायेत. पहिला प्रकार आहे शिरपूर तालुक्यातल्या अहिल्यापूर इथला. इथल्या मनिषा गिरासे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न करायचं आहे म्हणून लग्न जुळवून देणाऱ्या गावातील दोन महिलांशी त्यांनी संपर्क केला. मुलगी दाखवण्यासाठी त्यांनी पंधरा हजार रूपये घेतले. एक-दोन ठिकाणी मुली दाखवल्या. पुढे मुलाला पुणतांब्यातली सुंदर मुलगी पसंत पडली. मध्यस्थांनी सांगितल्याप्रमाणे 100 रूपयांच्या स्टॅम्पपेपरवर मंदिरात लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर मुलगी सासरी नांदायलाही आली. दरम्यान दर तीन दिवसांनी मध्यस्थी महिला येऊन मुलीची भेट घेत. त्यानंतर 12 ते 14 दिवसांनी नववधूनं घरातील सोनं आणि पैसे घेऊन पोबारा केला, ती परत आलीच नाही. 

अगदी असाच प्रकार शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा इथं घडलाय. तक्रारदार कैलास बडगुजर यांच्या मुलाचं लग्न करायचं हे समजताच मध्यस्थांनी त्यांच्याकडून दीड लाख रूपये घेतले. मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर मंदिरात लग्न लावण्यात आलं. पण लग्नानंतर चार-पाच दिवसात मुलीनं जत्रेत जाण्याचा हट्ट धरला आणि घरातलं सोनं नाणं घेऊन जत्रेतूनच पोबारा केला. 

या दोनही घटनांनी धुळे जिल्ह्यातील नवरदेव आणि त्यांचे कुटुंबिय चांगलेच हादरून गेलेत. सुंदर मुलींची भुरळ या नवरदेवांना चांगलीच महागात पडलीय. यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. हे रॅकेट लवकरात लवकर पोलिसांच्या हाती सापडायला हवं. नाहीतर लग्नाळू पोरांवर सिंगलच राहायची वेळ येईल. 

Web Title -  Dhule wedding fraud news 


संबंधित बातम्या

Saam TV Live