शरद पवारांचा 100 तासांचा राजकीय ब्लॉकबस्टर सिनेमा! एकदा तरी पाहाच...

शरद पवारांचा 100 तासांचा राजकीय ब्लॉकबस्टर सिनेमा! एकदा तरी पाहाच...

शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत राजकीय भूकंप रंगला. तब्बल 100 तास महाराष्ट्राने एक जिवंत सिनेमा अनुभवला. सिनेमालाही लाज वाटावी, असे ट्वीस्ट या भूकंपात होते. हा 100 तासांचा सिनेमा लिहीला कुणी?  या सिनेमाचे दिग्दर्शक कोण होते? या सिनेमाची हिरोईन कोण होती? स्टोरी लाईन कुणाची? कोणाचे काय रोल होते? तुम्हीच पाहा.

कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. केवळ मनोरंजनासाठी राजकीय भूकंपाचं उपहासात्मक विश्लेषण करण्याचा आमचा एक भाबडा प्रयत्न आहे. यात काल्पनिक काही नसलं, तर काहीशी सिनेमॅटीक लिबर्टी घेण्यात आली आहे. मात्र त्यात कोणचाही अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही.

80 वर्षांचा सर्वात तरुण नायक.. आणि नायकच लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत..

जवाँ दिलों की धडकन - दस्तुरखुद्द शरद पवार 

सिनेमाची नायिका होती -  महाराष्ट्राची सत्ता

या सिनेमात सपोर्टिंग रोलची भूमिका बजावली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीं यांनी...

महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपात खलनायक होती भारतीय जनता पार्टी!

आणि या सिनेमात विशेष उल्लेखनीय भूमिका पार पडली ती, बारामतीकरांचे लाडके दादा... अर्थात अजितदादा पवार यांनी! तर या सिनेमाला इमोशनल टच दिला, सुप्रिया सुळेंनी! कधी आसू.. तर कधी हासू... इमोशनल टचसोबत प्रमुख भूमिकेत होते, हॉटेलात कैद असणारे 162 आमदार. खरंतर हॉटेलच्या लोकेशनवर काहीच खास घडलं नाही, पण सगळ्या सिनेमात हॉटेलच मेन लोकेशन होतं.

बेस्ट सपोर्टिंग रोलमध्ये, दिसले ते सुपरस्टार संजय राऊत! खटकेबाज डायलॉग्सवर सणसणीत संवादफेक करावी, अगदी तशीच चपखल भूमिका सुपरस्टार राऊतांनी पार पाडली! या सिनेमात खलनायक भाजप असली, तर शत्रूच्या भूमिकेत होते देवेंद्र फडणवीस. तर विनोदी भूमिका चोख वठवली ती चंद्रकांत पाटील आणि कंपनीने! 

सिनेमाचा दिग्दर्शक जितका तगडा, तितकेच तगडे होते या सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक! 
जयंत पाटील, दिलिप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या शाळेत राजकीय दिग्दर्शनाचा उत्तम कित्ता गिरवला. आणि या सिनेमाला चारचांद लावले. 
 
सिनेमा फक्त सुपरस्टारमुळे चालला नाही. तर पडद्यामागच्या कलाकारांनीही आपलं टॅलेंट दाखवलं. यात एकनाथ शिंदे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, मिलिंद नार्वेकर असतील, शशीकांत शिंदे असतील किंवा मग नवाब मलिक. 

सगळ्यांचे रोल वाटून दिले.. पण फक्त एक रोल काय होता, हे कळू शकलं नाही. हा रोल होता धनंजय मुंडेंचा... धनुभाऊ  फसलेल्या भूमिकेत होते की नकारात्मक भूमिकेत? याचा शोध सुरु आहे.. 

कदाचित आगामी राजकीय भूकंपाच्या सिनेमात हा रोल स्पष्ट होईल. तूर्तासतरी पवारांच्या या ब्लॉकबस्टर सिनेमाने सगळ्यांना जोर का झटका दिलाय, इतकंच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com