माऊलींची ज्ञानेश्‍वरी हिंदीत; सत्तरीतल्या ज्येष्ठ कवींचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 मार्च 2020

ज्येष्ठ कवी मधू नेवे यांनी ज्ञानेश्वरी हिंदीतून अनुवादीत केलीये. ज्ञानेश्वरीची सरळ सोप्या हिंदी भाषेत अनुवाद करण्याची किमया ज्येष्ठ कवी मधू नेवे यांनी साधलीय. आपल्या सत्तरीत हात थरथरत असताना त्यांनी सलग सात वर्ष अविरत अभ्यास करत ही किमया साधलीये.

जळगाव : आता विश्‍वात्मके देवे। 
येणे वाग्यज्ञें तोषावें। 

पसायदानातील या ओव्या कानी पडल्या तरी आपले दोन्ही कर आपसूकच जोडले जातात.. गीतेचा सार, जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या माऊलींच्या ज्ञानेश्‍वरीतून उभ्या जगाला कल्याणाचा मंत्रही मिळालांय... मात्र, वयाच्या सत्तरीत हात थरथरत असताना सलग सात वर्षे अविरत अभ्यास करत ज्ञानेश्‍वरीचा सोप्या हिंदीत अनुवाद करण्याची किमया साधलीय जळगावातील ज्येष्ठ कवी मधू नेवे यांनी. या किमयेचा प्रारंभ त्यांनी विश्‍वात्मक देवाला नमन करताना.. 
हे विश्‍वात्मक प्रभो। 
इस वाग्‌यज्ञ से संतुष्ट होना। 
अशा शब्दांत साकारलाय.. 

मधू नेवे. जळगाव शहरातील ज्येष्ठ कवी. वयोवर्षे 86, आता ते शरीराने थकलेले.. तरीही, त्यांच्यातील कविमन तरुण. हिरतफिरत असताना मोकळ्या जागेत वृक्षारोपण करायचे, ती वृक्ष जगवायची.. त्याबाबत प्रचार-प्रसार करायचा, इतरांचे प्रबोधन करायचे.. असा त्यांचा नित्यक्रम होता. या नित्यक्रमात त्यांच्या कवीमनाने त्यांच्याकडून अनेक रचना करून घेतल्या, तर काही पुस्तकांचे अनुवादही करून घेतले. हिंदीवर त्यांचे विशेष प्रभुत्व म्हणून अशा निवडक पुस्तकांचा अनुवाद त्यांनी हिंदीतून केलेला.. 

ज्ञानेश्‍वरीचीही हिंदीत सेवा 
जीवनात प्रेरणा देणाऱ्या या नित्यक्रमातून त्यांच्या मनात साधारणत: 17-18 वर्षांपूर्वी ज्ञानेश्‍वरीची सेवा करण्याचा विचार आला. आंबेजोगाईचे श्री. मूळगावकर त्यांना भेटले. त्यांनी हिंदीवर प्रभुत्व आहे म्हणून त्यांना ज्ञानेश्‍वरीची सेवा हिंदीत अनुवादातून साकारण्याचा सल्ला दिला. वयाच्या सत्तरीत ज्ञानेश्‍वरीच्या हिंदी अनुवादाचे काम कसे करणार? हा प्रश्‍न होता. 

माऊलींची प्रेरणा.. काम सुरू 
माऊलींच्या प्रेरणेतून नेवेंना बळ मिळालं... अन्‌ ते कामाला लागले. ज्ञानेश्‍वरीच्या प्रत्येक ओवीचा अभ्यास केला, त्याचे शब्दश: भाषांतर अपेक्षित नव्हतेच.. आशय तोच राहावा, ओव्यांची रचनाही असावी आणि हे साहित्य वाचनीय व्हावं अशा तिहेरी उद्देशातून हे काम सुरू झालं. आणि सतत सात वर्षे अविरत अभ्यासातून ज्ञानेश्‍वरीच्या 1811 ओव्यांना नेवेंनी हिंदी भाषेचा साज चढविला.. आणि तयार झाला हिंदीत अनुवादित ज्ञानेश्‍वरीचा 616 पानांचा ग्रंथ. 
 
दलुभाऊंचे सहकार्य 
हा ग्रंथ लिखित स्वरूपात होता. त्याला छापील स्वरूपात आणायचा प्रश्‍न समोर होता. पण, नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेल्या दलिचंद जैन (दलुभाऊ) यांनी या साहित्याला मुद्रित स्वरूपात साकारण्यासाठी सहकार्य केले. दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर 2010 मध्ये या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. यासोबतच नेवेंच्या एकली मुलगी, "खेळिया : बालगीतांचा खजिना, आनंदमयी : बरसात भक्तिरसाची असे वाङ्‌मय प्रसिद्ध झाले आहे. अप्रकाशित साहित्याचीही मोठी यादी आहे. 

Web Title Dnyaneshwary Translate Hindi Language Madhu Neve


संबंधित बातम्या

Saam TV Live