राज्यभरातील प्रमुख भाजी मंडई बंदमुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं नुकसान, ग्राहकांचीही परवड

साम टीव्ही न्यूज
रविवार, 12 एप्रिल 2020

कोरोनाच्या संकटात राज्यातील प्रमुख भाजी आणि फळ मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे चाकरमान्यांची परवड तर होणारच आहे, मात्र काबाडकष्ट करणारा शेतकरीही संकटात सापडलाय.

माणसांच्या जीवावर उठलेला कोरोना आता लोकांच्या पोटावरही लाथ मारतोय की काय? अशी अवस्था निर्माण झालीय. कारण राज्यभरातील प्रमुख भाजी आणि फळांचे बाजार बंद करण्यात आलेयत. कोरोनाच्या संकटात संपूर्ण देश लॉकडाऊन केला असला तरी भाजी आणि फळांचे बाजार सुरू ठेवण्यात आले होते. मात्र कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे आणि ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केल्याने आता बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्यापुढे मोठं संकट उभं राहिलंय.

कोणत्या बाजार समित्या राहणार बंद?
नवी मुंबईचं एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर तिकडे ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजी मंडई, फळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय झालाय. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद कार्यक्षेत्रातील भाजी, फळ मार्केटही बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातीलही सर्व भाजी, फळ मार्केट बंद करण्यात आलेयत.

मुळात, प्रमुख भाजी मंडई बंद राहणार असल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान तर होणार आहेच, पण त्याचसोबत चाकरमान्यांच्या ताटातील भाजी आणि फळं हिरावली जाणारेत. भायखळ्याची मंडईही बंद करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे बाजार समित्या बंद केल्याने काबाडकष्ट करून पिकवेला भाजीपाला आणि फळं कुठं विकायची असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा रहिलाय. 

लॉकडाऊनच्या काळात लोकांना भाजी, फळं कमी पडू नयेत म्हणून मंडई सुरू ठेवण्यात आले होते. मात्र बाजार समित्यांमध्ये होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगकडे होणारं दुर्लक्ष पाहता बाजार समित्या बंद करण्यात आल्यायत. बाजार समित्या पुन्हा कधी सुरू होणार हे माहित नसलं तरी, लोकांनी शिस्त पाळली असती तर ही वेळ आली नसती, हेही तितकंच खरंय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live