आघाडीपुढे अस्तित्वाचे आव्हान

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 मे 2019

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीचा युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून फुटला. त्या सभेला झालेली गर्दी पाहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मनात पाल चुकचुकली असणार. त्यापूर्वी कोल्हापुरातच झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेलाही लक्षणीय गर्दी झाली होती. दोन्ही ठिकाणच्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होऊ शकते आणि गड आपल्या हातून निसटू शकतो, हे लक्षात आल्यानंतरही आघाडीची छावणी शांतच राहिली. काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’तील दुरावलेली मने जुळली नाहीत. म्हणजे ‘आमचं ठरलंय’, अशी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा देणारी मोहीम उघडल्यानंतरही काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची समजूत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही काढू शकले नाहीत. दुसरीकडे, ‘राष्ट्रवादी’चे खासदार धनंजय महाडिक यांच्याबद्दलची नकारात्मकता फारसे प्रभावी नसलेले युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पथ्यावर पडली. गेल्या वेळी ३३ हजार २५९ मतांनी पडलेले प्रा. मंडलिक या वेळी तब्बल दोन लाख ७१ हजार मतांनी विजयी झाले. दिल्लीत वजन ठेवण्यासाठी आणि शेती-सहकाराच्या राजकारणासाठी शरद पवारांना ही जागा महत्त्वाची वाटत होती. पण, त्यांना कार्यकर्त्यांची साथ मिळाली नाही. 

गाफिल राहिल्याने शेट्टींना धक्का
दुसरीकडे, हातकणंगले मतदारसंघातून हमखास निवडून येणारी जागा म्हणून खासदार राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाशी त्यांनी आघाडी केली. पण, शेट्टी तब्बल ९६ हजार मतांनी नवखे म्हणावे असे शिवसेनेचे तरुण उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभूत झाले. आपला पराभव होईल, हे स्वप्नातही वाटले नव्हते, या त्यांच्या प्रतिक्रियेनेच ते या निवडणुकीत किती गाफील राहिले, याची साक्ष दिली. राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार उल्हास पाटील, शिवाजी माने अशा दुरावलेल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांनीच त्यांच्या विरोधात रान उठविले. त्यात ज्यांच्या विरोधात आंदोलन करायचे, त्या कारखानदारांशीच शेट्टींनी ‘मांडवली’ केली. ते फक्त आपल्याच जातीच्या लोकांना जवळ करताहेत, असे त्यांच्यावर आरोप झाले. बहुदा ते मतदारांना पटलेही. त्यामुळे महाराष्ट्रातील धक्कादायक निकाल हातकणंगलेत नोंदविला गेला. शेती प्रश्नांच्या आंदोलनांतून दिल्लीला धडक देणारा हा नेता निवडणुकीत निष्प्रभ ठरला. महत्त्वाचे म्हणजे शेट्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या शेतकरी मतदारांनीच शेट्टींना नाकारले. शेट्टींच्या पराभवामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातीलच नव्हे; तर राज्य आणि देशातील ऊसदर, शेती प्रश्न आणि त्यासाठीच्या आंदोलनांना ‘ब्रेक’ लागणार आहे.

काँग्रेस पराभूत मानसिकतेत
सांगलीची लढत यंदा तिरंगी होती. सांगलीत चौदा वेळा काँग्रेसचा खासदार निवडून आला होता. अगदी आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पराभूत झाल्या, त्या वेळीही सांगलीतून काँग्रेसचे अण्णासाहेब गोटखिंडे खासदार झाले होते. पण, २०१४ च्या पराभवानंतर सांगलीतील काँग्रेस पराभूत मानसिकतेत गेली आणि या निवडणुकीत ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून लढाईपूर्वीच शस्त्रे खाली ठेवली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडाची भूमिका घेतल्यानंतर आघाडी धर्म म्हणून राजू शेट्टींनी ही जागा विशाल पाटलांना दिली. या वेळी सांगलीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी धनगर, दलित, मुस्लिम, बहुजनांची मते घेतली. विशाल पाटील यांना तीन लाख ३३ हजार ६४३, तर पडळकर यांना तीन लाख २३४ मते मिळाली. गेल्या वेळचे मताधिक्‍य घटून खासदार संजय पाटील एक लाख ६४ हजार ३५२ मतांनी विजयी झाले. 

मताधिक्‍य घटल्याने चिंता
सोलापूर आणि माढा मतदारसंघावरील पकड काँग्रेस आघाडीने गमावली आहे. सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे उमेदवार आणि लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी खासदार बनले. तेथे एक लाख ७० हजार मते मिळवून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पराभवाकडे नेले. माढा मतदारसंघात गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणाऱ्या मोहिते पाटील घराण्याने निवडणुकीत भाजपला साथ दिली आणि निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले. 

नाही म्हणायला पश्‍चिम महाराष्ट्रातील ‘राष्ट्रवादी’चे साताऱ्यातील उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले. पण, या वेळी त्यांचेही मताधिक्‍य घटले असून, ते त्यांना भविष्याची चिंता करायला लावणारे आहे. गेल्या वेळी मोदी लाटेतही त्यांना तीन लाख ६७ हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. ते या वेळी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांमुळे सव्वा लाखांवर आले. या सर्व घटना आगामी काळातील दोन्ही काँग्रेसपुढील आव्हाने स्पष्ट करणाऱ्या आहेत.

काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रात फोफावलेला वटवृक्ष. शेतीमातीच्या प्रश्नांची जाण असल्याने आतापर्यंत त्याची पश्‍चिम महाराष्ट्रातील मुळे भक्कम होती. आता या मुळांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे हा वटवृक्ष सावरण्यासाठी आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

Web Title: Editorial Article Shrirang Gaikwad Western Maharashtra Aghadi Politics

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live