VIDEO | खडसेंची भाजपवर जोरदार टोलेबाजी... एकदा ऐकाच...

VIDEO | खडसेंची भाजपवर जोरदार टोलेबाजी... एकदा ऐकाच...

गोपीनाथ गडावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी बोलताना भाजप नेते एकनाथ खडसेंनी पक्षातील नेत्यांवरच जोरदार टीकास्त्र सोडलंय... पक्ष सोडून जाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय.पक्षाविरोधात न बोलण्याचे आदेश असल्याचंही असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलयं. नेमकं काय म्हणालेत एकनाथ खडसे ऐका!

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील पांगरी येथील गोपीनाथगडावर अभिवादन कार्यक्रम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि फडणवीस यांच्यावर थेट टीका करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी मुंडे स्मारकाला भाजप सरकार काळात गती मिळाली नसल्याचाही आरोप केला होता. यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली होती.

दरम्यान, गोपीनाथगडावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह इतर वरिष्ठ भाजप नेते आणि मोठ्या जनसमुदायासमोर त्यांनी आपली खदखद तर व्यक्त केलीच, शिवाय भाजप व देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच धुलाई केली. आपण आणि इतर नेते पंकजा मुंडेंच्या पाठीमागे खंबीर असल्याचे सांगायलाही खडसये विसरले नाहीत.

कितीही छळलं, कितीही त्रास दिला तरी पंकजा भाजपसोबतच आहेत. पुढेही राहतील, असे सांगताना त्यांनी 'माझा भरोसा धरु नका, पण पंकजा भाजप सोडणार नाहीत' हे सांगायलाही खडसे विसरले नाहीत. ४२ वर्षांपासून गोपीनाथराव मुंडेंसोबत आपण राहीलो. दोघांनीही संघर्षातून वाट काढली. शेटजी - भटजीचा पक्ष असे हिणवल्या जाणाऱ्या भाजपला गोपीनाथराव मुंडेंनी बहुजन चेहरा दिल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.

आम्ही पक्षातून जावे, अशी वागणूक दिली गेली

पराभूत झाल्याचे दु:ख असून, हे घडले नाही तर घडवून आणल्याचा पुनरुच्चारही श्री. खडसे यांनी केला. आपल्यावर आरोप झाले, राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, संघर्ष करायला भाग पाडले. असाच प्रकार गोपीनाथराव मुंडेंच्या बाबतीतही झाल्याचे सांगून आरोप करणारे पक्षातीलच होते, असा घणाघातही श्री. खडसे यांनी केला. राज्यात भाजप उभी करण्यासाठी मुंडे व आपण रक्ताचे पाणी केले. मात्र, संघर्ष कुठपर्यंत करणार असा सवाल करत, आम्ही पक्षातून जावे अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे हात करत केला.

फक्त मुंडेंकडे दानत होती

माझ्याकडे येऊन गोपीनाथराव मुंडेंनी विरोधी पक्षनेतेपद दिल्याचे सांगत, असे स्वत:चे पद देण्याची दानत फक्त मुंडेंकडे होती असेही एकनाथ खडसे म्हणाले. आपली संमती असेल तरच देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्षद द्यावे, असा केंद्रीय भाजपचा निरोप होता. त्यासाठी आपल्याला मुंडेंनी गळ घातली होती. ज्यांना मोठे पद दिले त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

जास्त बोललो तर शिस्तभंग होईल

आपल्याकडे बोलण्यासाठी खुप आहे मात्र वेळ नसल्याचे सांगून जास्त उघड करुन दाखविले तर शिस्तभंग होईल, अगोदरच आपले तिकीट कापल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले. जसा माझ्या व गोपीनाथराव मुंडेंच्या जीवनात प्रसंग आला तसा पंकजा मुंडेंच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले. पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

Web Title: Eknath Khadse Strongly Criticised BJP Leaders and Devendra Fadanvis in Beed

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com