माॅन्सूनला यंदा ‘एल निनो’चा धोका नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 मार्च 2018

पुणे : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर महिन्यानंतर तयार होण्याचे संकेत आहेत. तोपर्यंत देशातील मॉन्सून हंगाम पूर्ण होत असतो. त्यामुळे यंदाच्या माॅन्सूनवर ‘एल निनो’चा परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर महिन्यानंतर तयार होण्याचे संकेत आहेत. तोपर्यंत देशातील मॉन्सून हंगाम पूर्ण होत असतो. त्यामुळे यंदाच्या माॅन्सूनवर ‘एल निनो’चा परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज अमेरिकेतील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र भारतीय हवामान तज्ज्ञांनी ही शक्यता फेटाळून लावल्याने पावसाच्या प्रमाणावरील अनिश्‍चितता दूर होणार अाहे. देशात साधारणत: जून महिन्याच्या सुरवातीला माॅन्सून वारे केरळमधून देशात प्रवेश करतात. तर सप्टेंबर महिन्यात वायव्य भागातील राजस्थामधून परतीचा प्रवास सुरू करतात.

गेल्या ५० वर्षाच्या सरसरीनुसार माॅन्सून काळात देशात सरासरी ८९ सेंटिमीटर पाऊस पडतो. त्यात चार टक्के वाढ, घट (९६ ते १०४ टक्के पाऊस) झाली तरी हंगामातील पाऊस सरासरी एवढा मानला जातो. देशात वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी सुमारे ७० टक्के पाऊस माॅन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) पडतो. त्यामुळे देशाच्या २ लाख कोटी डाॅलरच्या अर्थव्यवस्थेत १५ टक्के वाटा असलेल्या शेती क्षेत्रावर, तर दोन तृतीयांश लोकसंख्येवर थेट परिणाम होतो.  

मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस शेती आणि संपूर्ण अर्थव्यवस्था वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. पूर्व-मध्य प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने एल निनो स्थिती तयार होते. ठराविक वर्षांनंतर ही स्थिती सातत्याने येत असते. शाश्वत जलसिंचनाची सुविधा नसलेल्या देशातील ५० टक्के शेतकऱ्यांना माॅन्सूनचा पाऊस भात, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन पिकांच्या लागवडसाठी उपयुक्त ठरतो. २०१४ आणि २०१५ मध्ये सलग दोन वर्षे दुष्काळ पडला होता. शतकात चौथ्यांदा आलेल्या या स्थितीमुळे देशाच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. तर शेतकरी आत्महत्याही वाढल्या होत्या. त्यानंतर २०१६ मध्ये सरासरी पाऊस पडला होता. तर २०१७ हवामान विभागाने ९८ टक्के पावसाचा अंदाज दिला असताना, देशात सरासरी ९५ टक्के पाऊस पडला होता. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live