मोदी की राहुल गांधी ? थोड्याच वेळात निकाल

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

543 
लोकसभेच्या एकूण जागा 

542 
निवडणूक झाली 

67 टक्के 
देशातील सरासरी मतदान 

90 कोटी 
एकूण मतदार 

8049 
एकूण उमेदवार 

नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या निवडणूक सामन्याचा सर्वांत उत्कंठावर्धक क्षण येऊन ठेपला आहे. या सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून कोण सत्ताकरंडक उंचावणार, हे उद्या (ता. 23) रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. देशातील प्रत्येक जनतेशी जोडली गेलेली ही निवडणूक आहे. जनतेने आपल्या आणि देशाच्या विकासाची आस मनात ठेवून मतदान केले. जनतेचे मत "न्याय'च्या पारड्यात की "फिर से मोदी सरकार' हे आज स्पष्ट होईल. 

मतदानाचा पहिला टप्पा पार पडला तो 11 एप्रिलला 19 मेपर्यंत सात टप्प्यांत संपूर्ण देशांत ही प्रक्रिया पूर्ण झाली. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत "फिर एक बार मोदी सरकार' असा नारा दिला, तर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी "न्याय' सरकारचे आश्‍वासन दिले. चौकीदार चोर है, भ्रष्टाचारी नं. 1 पासून खाकी अंडरवेअर, औरंगजेब अशा आरोपांची राळही उडविली गेली. 

कलचाचण्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिला आहे, जनतेचा खरा कौल आज समजेल. कलचाचण्यांवर विरोधकांनी विश्‍वास न ठेवता आणि भाजपनेही सावध भूमिका घेताना सर्व प्रकारच्या परिस्थितीची शक्‍यता लक्षात घेऊन आपापले डावपेच आखले आहेत. भाजपने जेवणावळीच्या निमित्ताने आपल्या मित्रपक्षांशी संवाद साधत खुंटी बळकट करून घेतली आहे. शिवाय, बिजू जनता दल आणि वायएसआर कॉंग्रेस यांसारखे तगडे प्रादेशिक पक्षही भाजपच्या वळचणीला जाऊ शकतात. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाल्या दिवसापासून धुसफूस सुरू आहे. त्यांच्यातील भांडणे विकोपाला गेली तर ते वेगळा निर्णय घेऊ शकतात. 

दुसरीकडे, गेल्या दोन महिन्यांपासून आणि विशेषत: मागील चार दिवसांत कलचाचण्यांचे अंदाज बाहेर आल्यानंतर तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक यांच्या आपापसांतील चर्चेला प्रचंड वेग आला होता. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीने भाजपेतर आणि कॉंग्रेसतर आघाडीसाठी अजूनही प्रयत्नशील आहेत. अर्थात, सत्तेचा लंबक कोणत्या बाजूला झुकेल, त्यावर या प्रयत्नांची दिशा अवलंबून असेल. 

या सर्व पक्षांपासून कॉंग्रेस पक्ष दोन हात दूर असला तरी भाजपेतर सरकार स्थापन होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांचीच भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेवर येऊच द्यायचे नाही, अशी कॉंग्रेसचीही प्रबळ इच्छा आहे. त्यामुळेच प्रसंगी आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, इतर कोणत्याही प्रबळ प्रादेशिक पक्षाला पंतप्रधानपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ, असे सूतोवाच त्यांनी केले आहे. त्यामुळे निकालानंतरही सामन्यात चुरस कायम राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

यंदाची निवडणूक ही नेहमीपेक्षा वेगळी ठरली ती आरोप-प्रत्याचारोपांमुळे. प्रचारात विकासाचे मुद्दे बाजूला पडून एकमेकांच्या खासगी आयुष्यावर बोलले गेले. कॉंग्रेसने 60 वर्षांत काहीच केले नाही आणि गेल्या पाच वर्षांत भाजपमुळे देशाची मान जगात कशी उंचावली गेली, सांगताना पुलवामासारख्या घटनांचे दाखले देण्यात आले. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीवरही शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाला. राफेल, नोटाबंदी, शेतकऱ्यांची पीककर्ज माफी यांमधील सरकारच्या उणिवा उघडकीस आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live