साखर उद्योगात यंदा निवडणुकांचे धुमशान

साखर उद्योगात यंदा निवडणुकांचे धुमशान

पुणे: राज्याच्या सहकारी साखर उद्योगाला निवडणुकांचे वेध लागले आहेत. डिसेंबरअखेर ५६ कारखान्यांच्या निवडणुका होत असून, ग्रामीण राजकारणाची दिशा यातून स्पष्ट होणार आहे. 

राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका तालुक्याच्या आणि काही ठिकाणी जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरतात. कारखान्यांच्या निवडणूक निकालानंतर पुढे पंचायत समित्या, जिल्हा परिषदांपासून ते आमदार, खासदार पदाच्या निवडणुकांच्या व्यूहरचना बदलतात. यामुळे साखर कारखान्यांच्या निवडणुका ग्रामीण राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जातात.

“राज्यातील ५६ सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका घेण्यासाठी सहकार विभाग सज्ज झालेला आहे. कोणत्याही साखर कारखान्याची आधीच्या निवडणुकीचा निकाल लागलेल्या दिवसांपासून बरोबर पाच वर्ष पूर्ण झालेली असतील, त्या कारखान्यांच्या निवडणुका होतील,” असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. 

उदाहरणार्थ एखाद्या कारखान्याची आधीचा निवडणूक निकाल १० एप्रिल २०१५ रोजी जाहीर झालेला असल्यास ९ एप्रिल २०२० रोजी या कारखान्याच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत पूर्ण होईल. त्यामुळे अशा कारखान्याने निवडणुका घेण्याबाबत अत्यावश्यक असलेली ई-२ नमुन्यातील कायदेशीर माहिती किमान १८० दिवस अगोदर शासकीय यंत्रणेकडे पाठवावी लागेल. 

विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या १२० दिवस अगोदर साखर कारखान्यांच्या मतदारांची प्रारूप यादी तयार करून ती राज्याच्या संबंधित साखर सहसंचालकांकडे द्यावी लागणार आहे. सहसंचालकांकडून या याद्या फलकावर लावल्या जातील व त्यावर आक्षेप घेण्यासाठी दहा दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. प्रारूप मतदार यादीतील आक्षेप दहा दिवसांच्या आत नोंदवावे लागतील. आक्षेप आल्यापासून दहा दिवसांत सुनावणी घेतली जाईल. पाच दिवसांत सुनावणीला उत्तरे दिल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करावी लागेल. 

साखर कारखान्यांच्या मतदाराच्या याद्यांमधील आक्षेप, निराकरण झाल्यानंतर अंतिम प्रसिद्धी होताच ११ ते १९ दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकारी नेमणुकीचा प्रस्ताव द्यावा लागणार आहे. साखर सहसंचालक व निवडणूक निर्णय अधिकारी संयुक्तपणे बसून अंतिम निवडणूक कार्यक्रम राज्याच्या निवडणूक प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठवणार आहेत. 
या निवडणूक कार्यक्रमात दुरुस्ती असल्यास ती सुचवून प्राधिकरणाकडून अंतिम मान्यता मिळताच नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी पाच दिवस दिले जातील.

सहाव्या दिवशी छाननी, तर सातव्या दिवशी वैध अर्ज जाहीर होतील. दोन आठवडे माघारीसाठी असतील. अंतिम उमेदवार व चिन्हांची यादी २२ व्या दिवशी जाहीर होईल. ही यादी जाहीर होताच तेथून पुढे ७ ते १५ दिवसांत साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतदान घ्यावे लागेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

मतदानापासून तीन दिवसांत मोजणी
साखर कारखान्यांच्या संचालक मंडळ निवडीसाठी मतदान होताच तीन दिवसांत मोजणी होईल. निकाल जाहीर होताच १५ दिवसांत कारखान्याच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन निवडले जाणार आहेत. संचालक निवडणुकीकरिता नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी हेच चेअरमन निवडणूक प्रक्रियेचेदेखील प्रमुख असतील.

Web Title : Election Fever Sugar Industry

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com