वीज ग्राहकांना मिळणार दिलासा, वाचा वीज बिलात कितीची सवलत?

साम टीव्ही
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020
  • वीज ग्राहकांना मिळणार दिलासा 
  • वीज बिलात कितीची सवलत?
  • आर्थिक अडचणीतल्या महावितरणवर आर्थिक ताण

वाढीव वीजबिलाचा झटका बसलेल्या ग्राहकांना दिलासा देण्याची तयारी सरकारने चालवलीय. पण त्याच आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणला सावरण्याचं आव्हानही सरकारसमोर आहे.

लॉकडाऊन काळातील भरमसाट वीज बिलांमुळे हैराण झालेल्या वीज ग्राहकांना आता दिलासा मिळणार आहे. पुढच्या बीलात वीज ग्राहकांना 500 ते 800 रुपयांची सवलत देण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारी पातळीवर विचाराधीन आहे. फक्त महावितरणच नाही तर मुंबईतील टाटा, बेस्ट आणि अदानी कंपनीच्या वीज ग्राहकांनाही ही सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे.

मुंबईसह राज्यातील घरगुती वीज ग्राहकांची संख्या सुमारे 2 कोटी 60 लाख इतकी आहे. या ग्राहकांचं 100 युनिटपर्यंतचं वीजबिल माफ केल्यास 600 ते 800 रुपयांची सवलत ग्राहकांना मिळू शकते, मात्र त्यामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे 2000 कोटींचा बोजा पडण्याची शक्यता आहे. पण महावितरणसह इतर पुरवठादार कंपन्या या सवलतीचा भार उचलायला तयार नाहीत. महावितरण कंपनीवर अगोदरच 14 हजार कोटींचं कर्ज आहे. 

त्यामुळे सरसकट सवलत द्यावी की, ग्राहकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार सवलतीचा लाभ द्यावा, याबाबत विचार सुरू आहे. एकूणच काय तर महावितरणची आर्थिक स्थिती अधिक बिघडू न देता ग्राहकांना दिलासा देण्यासाठीची तारेवरची कसरत राज्य सरकारला करावी लागणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live