मन सुन्न करणारी बातमी! एक मुलगा अधिकारी, दुसरा पुढारी, आई मात्र रस्त्याकडेला खितपत पडली...

साम टीव्ही
बुधवार, 19 ऑगस्ट 2020
  • एक मुलगा अधिकारी, दुसरा पुढारी, आई मात्र भिकारी
  • दोन मुलं असूनही रस्त्याकडेला खितपत पडली आई
  • असली मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी

पंजाब: पदरात दोन गर्भश्रीमंत मुलं असणारी आई किती आरामात असते. हो ना? पण नाही. आता आम्ही तुम्हाला अशी आई दाखवणार आहोत, जिचा एक मुलगा अधिकारी आणि दुसरा मुलगा पुढारी आहे. पण ती मात्र भिकारी आहे. ही आई कुठली आहे?  आणि तिच्यावर ही वेळ का आलीय? पाहूयात.

ही आज्जी मातीच्या उभारलेल्या भिंतीच्या छताखाली खितपत पडलीय. 82 वर्ष वय. अंगावर कपडेही नाहीत. जर्जर झालेलं शरीर. रस्त्यावरच्या जगण्याने देहाला झालेल्या असंख्य जखमा. सहन करता येत नाहीत येवढ्या वेदना. तुम्हाला वाटेल या आज्जीला आभाळ आणि जमिनीच्या मध्ये नात्याचं कुणीच नाहीय. पण तसं नाहीय. पडक्या भिंतीच्या आडोशाला खितपत पडलेली ही आज्जी अनाथ नाहीय. तिला मुलं-बाळं, कुटंब नाहीय असंही नाहीय. तिला चांगली धडधाकट दोन मुलं आहेत. एक मुलगा सरकारी आधिकारी आहे आणि दुसरा मुलगा एका पक्षाचा नेता आहे.

रस्त्याकडेला मातीच्या पडक्या छताखालून विव्हळण्याचा आवाज ऐकला आणि पोलिसांनी धाव घेतली. तर या आज्जी दिसल्या. तहानेनं व्याकूळ होऊन सुकलेलं तोंड... अंगावर असंख्य जखमा, जखमांमध्ये किडे. बस्स... अजून न बोललेलच बरं...
ही आज्जी पोलिसांना सापडली पंजाबच्या बूडा गुज्जर रोडवर. पोलिसांनी या आज्जींना सरकारी रुग्णालयात दाखल केलं. आणि अधिकारी आणि पुढारी असलेल्या तिच्या दोन्ही मुलांना कळवलं. आईच्या सेवेसाठी आम्ही पगारी माणूस ठेवल्याची मखलाशीही त्यांनी केली. उशिरा जागे झालेल्या मुलांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तिथं आज्जींनी शेवटचा श्वास घेतला.

पोटात पाय हलवले तरी आईच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू तरळतात. जन्मल्यापासून जीवापेक्षा जास्त काळजी घ्यावी. कणाकणानं वाढतवत राहावं. पहिलं पाऊल टाकताना धडपडून पडलं की गाय जशी वासराकडे धावते तसं धावावं. पोटच्या गोळ्यानं केलेली हालचाल स्वत:च्या हृदयाच्या ठोक्यांपेक्षाही मोठी वाटावी. अशी असते आई.. पण या आईच्या शेवटच्या हालचाली रस्त्याच्या कडेला होत असताना तिची पोटची मुलं मात्र स्वत:च्या जगात मश्गुल होती. स्वामी तिन्ही जगाचा असूनही आईला मात्र भिकारी बनवून भंपक श्रीमंतीच्या कोंढाळ्यात होती तिची मुलं... खरंच... अशी मुलं असण्यापेक्षा नसलेलीच बरी... नाही का?

मुंबई


संबंधित बातम्या

Saam TV Live