फेसबुक तुमची वैयक्तिक माहिती कसं चोरतं आणि काय करतं ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 मार्च 2018

जगप्रसिद्ध सोशल मीडिया साइट फेसबुक ही सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. ‘डिलीट फेसबुक’ ही फेसबुकविरोधातली मोहीम सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली आहे. केम्ब्रिज अॅनॅलिटिकाने फेसबुकच्या जवळपास 5 कोटी युजर्सचा डेटा एका अॅपच्या माध्यमातून मिळवला. या डेटाचा वापर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठी करण्यात आला, असा आरोप आहे.

जगप्रसिद्ध सोशल मीडिया साइट फेसबुक ही सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. ‘डिलीट फेसबुक’ ही फेसबुकविरोधातली मोहीम सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली आहे. केम्ब्रिज अॅनॅलिटिकाने फेसबुकच्या जवळपास 5 कोटी युजर्सचा डेटा एका अॅपच्या माध्यमातून मिळवला. या डेटाचा वापर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठी करण्यात आला, असा आरोप आहे. वैयक्तिक माहिती युजर्सच्या परवानगीविना वापरण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही आणि फेसबुकच्या बाबतीत तर नाहीच नाही. युजर्सही अनेकविध प्रकारे फेसबुकसोबत आपली खासगी माहिती शेअर करतात. ही माहिती युजर्सच्या परवानगीविना फेसबुक आपल्या फायद्यासाठी वापरत असते. मात्र, केम्ब्रिज अॅनॅलिटिकाने ज्या संख्येत युजर्सची माहिती मिळवून, तिचा गैरवापर केल्याच आरोप आहे, ते अत्यंत गंभीर प्रकरण मानले जात आहे. आता आपण जाणून घेऊया,फेसबुकवरुन आपली खासगी माहिती नेमक्या कशा प्रकारे चोरी केली जाते 

हे प्रश्न विचारून फेसबुक डाटा चोरी केला जातो 
मागच्या जन्मात तुम्ही कोण होता?, तुमचा मृत्यू कधी होईल?, तुम्ही कोणत्या अभिनेता/ अभिनेत्रीसारखं दिसता?, पुढचा जन्म तुमचा कुठं होईल? आदी प्रश्न फेसबुकवरून वारंवार विचारले जात आहेत...आपल्या जन्माचं रहस्य जाणून घेण्याच्या नादात तुम्ही जर या पोस्ट शेअर करत असाल तर सावधान! या प्रश्नांच्या माध्यमातून कदाचित तुमचा पर्सनल डाटा चोरी केला जाऊ शकतो.

फेसबुक कनेक्ट
आपल्या युजर्सची माहिती मिळवण्यासाठी फेसबुककडे सर्वात सोपा उपाय असतो, तो म्हणजे ‘Connect with Facebook’. सिमिलर टेकच्या रिपोर्टनुसार, जवळपास 50 लाखांहून अदिक वेबसाईट फेसबुकच्या माध्यमातून लॉग-इन करण्याची सुविधा देतात. फेसबुकवरुन लॉग-इन करणे, हा अगदी सोपा उपाय म्हणून अनेकदा युजर्सही तो अवलंबतात. जेव्हा तुम्ही ‘Connect via Facebook’ या पर्यायवर क्लिक करतात, त्यावेळी तुम्ही फेसबुकवरील तुमची खासगी माहितीही त्या वेबसाईटसोबत शेअर करत असता.

कुकीज
 कुकीजच्या माध्यमातून फेसबुक युजर्सच्या अॅक्टिव्हिटी आणि संबंधित माहिती गोळा करतं. या कुकीजबद्दल बोलताना फेसबुककडून कायम सांगितले जाते की, या माहितीचा उपयोग करुन युजर्सचा फेसबुकवरील वावर अधिक सोपा व्हावा आणि ठिकाणानुसार कंटेट पुरवण्यासाठी केला जातो. 2007 मध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी डेव्हलपर्सला निमंत्रित केले होते. त्यावेळी फेसबुककडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, थर्ड पार्टी वेबसाईट्सना फेसबुक युजर्सची फ्रेण्ड लिस्ट, लाईक्स, युजर बिव्हेइयर यांच्याशी संबंधित माहितीचा अॅक्सेस दिला जाईल.धक्कादायक म्हणजे, फेसबुकच्या माध्यमातून जेव्हा तुमची खासगी माहिती एखाद्या थर्ड पार्टी वेबसाईटकडे जाते, त्यावेळी त्यांच्याकडून ती माहिती नष्ट करण्याचा पर्याय फेसबुककडेही नाही. म्हणजे तुमची माहिती थर्ड पार्टी वेबसाईटकडे कायमची राहते. त्या माहितीचा कसा वापर केला जाईल, यावर कुणाचेही नियंत्रण नसते. किंबहुना, तसे नियंत्रण ठेवताही येत नाही.

ब्राऊजिंग डिटेल
जेव्हा तुम्ही फेसबुकवर ऑनलाईन येता, त्यावेळी एकूण तीन माध्यमातून तुमच्या प्रत्येक डिजिटल हालचालीवर नजर ठेवली जाते. तुमचं ब्राऊजिंग म्हणजे, तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल सर्च करत आहात, याची माहिती इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला असते. होस्ट वेबसाईट म्हणजे, ज्या वेबसाईटचा तुम्ही वापर करत आहात, त्या वेबसाईटच्या अॅडमिनना तुमच्या ब्राऊजिंग डेटाची माहिती असते. फेसबुकवरुन एखाद्या लिंकवर क्लिक करता, त्यावेळी तुमचा कशात रस आहे, याची माहिती फेसबुकला कळत असते.

केंब्रिज अॅनालिटिकाबाबत...

२०१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत अगदी अनपेक्षितपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला. हा विजय साऱ्या जगासाठी धक्कादायक होता. हिलेरी क्लिंटनसारख्या बलशाली दावेदाराला हरवून ट्रम्प महासत्तेच्या गादीवर आले. या साऱ्या प्रकारानं अनेकांची भाकीतं चुकीची ठरली. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केल्याचं श्रेय केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीला दिलं जातं. २०१४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून २ कोटी ७० लाख लोकांनी कोगन फेसबुक अॅप इन्स्टॉल केलं. जे अॅप पर्सनॅलिटी क्विझ असल्याचं भासवण्यात आलं. न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार या क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी युजर्सना पैसे दिले जायचे. द ऑब्जर्व्हरच्या माहितीनुसार समजा एखादा फेसबुक युजर ही क्विझ खेळत असेल तर त्याच्या अकाऊंटमध्ये असलेल्या जवळपास १६० युजर्सचा डेटा, वैयक्तीक माहितीचाही अॅक्सेस कोगनला मिळत होता. त्यामुळे २ कोटी ७० लाख लोकांनी सहभाग घेतल्यानंतर त्यांच्या नेटवर्कमधून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती मिळवण्यात आली. ही माहिती अॅक्सेस करताना संबधीत व्यक्तींची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. माहिती मिळवलेल्या युजर्सपैकी बहुतांश लोक हे अमेरिकन होते.

जेव्हा युजर्सच्या परवानगीशिवाय हे अॅप माहिती गोळा करत आहे हे लक्षात येताच फेसबुकनं काही वर्षांपूर्वीच हे अॅप हटवलं. तसेच संबधित माहिती ही डिलीट करण्यात येईल असं आश्वासनही आपण घेतल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. तर काहींच्या आरोपानुसार ही माहिती केंब्रिज अॅनालिटिकाला विकण्यात आली असून ट्रम्प यांना पुरक वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि लोकांचं मतपरिवर्तन करण्यासाठी याचा गैरवापर करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे.

डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल ?

डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी फेसबुक सेटिंग्जमधील प्रायव्हसीमध्ये जा. तिथे डिफॉल्ट सेटिंग्ज everyone असा पर्याय असेल. त्याला एडिट करून केवळ फ्रेंडस असं ठेवा आणि सेव्ह करा. म्हणजे तुमचा डाटा केवळ तुमचे मित्रच पाहतील. 

फेसबुकच्या डेटा लीकचे भारतात पडसाद
फेसबुकच्या डेटा लीकचं लोण आता भारतापर्यंत येऊन पोहोचले आहे. ज्या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीने फेसबुकचा डेटा लीक केल्याचा आरोप केला जात आहे, त्या कंपनीला २०१९  सालासाठी काँग्रेसने कॅम्पेनिंगसाठी निवडल्याचा आरोप केला जात आहे. ट्विटरवर #DataChorCongress हॅशटॅग वापरुन काँग्रेसला ट्रोल केले जात आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना स्पष्ट इशारा देत  केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले की, भारतात फेसबुकचे २० कोटी सदस्य आहेत. त्यांच्या वैयक्तिक गोपनीय माहितीचा दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. कारवाईसाठी त्यांना भारतातही बोलावले जाऊ शकते. डेटा चोरीचाच नव्हे, तर लोकशाही मूल्ये व निष्पक्ष निवडणुकीचा प्रश्न आहे. या प्रकाराने फेसबुक आणि दस्तूरखुद्द मार्क झुकेरबर्ग यांची प्रतिष्ठा डागाळली असली तरी या प्रकरणी दोघे मौन बाळगून आहेत.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live