'फडणवीस आणि चंद्रकात पाटीलांनीच आता ठाकरेंना हे विधान परिषदेवर नेण्यासाठी प्रयत्न करावे'

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 एप्रिल 2020

"माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनीच आता ठाकरे हे विधान परिषदेवर कसे निवडून जातील, यात लक्ष घालायला हवे."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेत नेमण्याचा  निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी लवकरात लवकर घेतील आणि त्यांचा निर्णय राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्यच असेल. कोणताही विचित्र निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या परंपरेला ते काळिमा फासणार नाहीत, अशी अपेक्षा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याचा ठराव राज्य मंत्रीमंडळाने सर्वानुमते मंजूर केला आहे. मात्र, या ठरावाच्या वैधतेबाबत सध्या विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी ही भूमिका मांडली. काकडे एवढ्यावरच थांबले नाहीत तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनीच आता ठाकरे हे विधान परिषदेवर कसे निवडून जातील, यात लक्ष घालायला हवे. त्यातून महाराष्ट्रासाठी पुढील शंभर वर्षांसाठी चांगला संदेश जाईल. अडचणीच्या काळात सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र काम करतात, हे त्यातून दिसून येईल, असाही सल्ला त्यांनी दिला. 

ते म्हणाले, ‘‘कोणत्याही अडचणीच्या काळात सत्तेवर असलेल्या सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. राज्यावर संकट आल्यानंतर आतापर्यंतच्या सर्वच विरोधी पक्षांनी सत्तेत असलेल्या सरकारला मदत केली आहे. राज्यावर कोरोनाचे सध्या मोठे संकट आहे. अशावेळी राज्यात सत्ता स्थिर असण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता रक्ष  राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अशावेळी राज्यपालांनी राज्याच्या हिताचा असा योग्य निर्णय घ्यावा. लवकरात लवकर उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून नियुक्ती करावी. मंत्रीमंडळाचा ठराव कुणी केला? तो कायदेशीर आहे की नाही? अशा गोष्टींवर आता कुणी वाद घालू नये, आपला देश, आपले राज्य सध्या अडचणीतून जात आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे.’’

 

येत्या २८ मे पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांची आमदारपदी नियुक्ती झाली नाही तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे राजकीय तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानादेखील गेल्या काही दिवसात या विषयावर चर्चा रंगत आहे. सत्तारूड आघाडी सरकारच्या दृष्टीने हा विषय अत्यंत गंभीर आहे. आघाडी सरकार राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे डोळे लावून बसले आहे. राज्यपालांनी मंत्रीमंडळाची शिफारस तांत्रिक कारणाने नाकारली तर राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आमदारपदी नियुक्तीबाबत विविध चर्चा उपस्थित केली जात असल्याच्या पार्श्वर्भूमीवर काकडे यांचे वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live