शेतकऱ्यांनो बोगस कृषी तज्ज्ञांपासून सावधान! 

साम टीव्ही
मंगळवार, 28 जुलै 2020
  • शेतकऱ्यांनो सावधान! 
  • बोगस कृषी तज्ज्ञांपासून रहा सावध
  • बोगस तज्ज्ञांच्या सल्ल्याने डाळिंबाच्या शेतीचं नुकसान 

बोगस बियाणं, नापिकी आणि त्यातच लॉकडाऊनचं संकट यामुळे राज्यातला शेतकरी पुरता अडचणीत आलाय. त्यातच आता राज्यात बोगस कृषी तज्ज्ञांचा सुळसुळाट झालाय. अपुऱ्या ज्ञानाच्या बळावर हे बोगस तज्ज्ञ शेतकऱ्यांचं नुकसान करतायत.

नगर जिल्ह्य़ातील संगमनेर, राहाता, राहुरी आणि श्रीरामपूर या भागांतील डाळिंब पिकांना पुन्हा एकदा तेल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. 
त्यातच जिवाणू आणि बुरशीजन्य रोगही वाढल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या परिसरात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली असता एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. बागायदारांना चुकीचा कृषिविषयक सल्ला मिळाल्याने रोगांचा अधिक फैलाव झाल्याची बाब समोर आलीय. 

हल्ली बहुतेक डाळिंब उत्पादक खत व्यवस्थापन, रासायनिक औषधांची फवारणी आणि बागांची निगा राखण्यासाठी सल्लागार नेमतात. यातले काही कृषी पदवीधर आहेत, पण बहुतांश स्वयंघोषित कन्सल्टंट, डॉक्टर आणि सल्लागार हे चक्क आठवी किंवा नववी शिकलेले असल्याची बाबही उघड झालीय. यातले काही जण तर पुर्वी बागांमध्ये फवारणीचं काम करत होते. 

आपल्याकडच्या जुजबी ज्ञानावरच हे सल्लागार एकरी चारशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचं शुल्क शेतकऱ्यांकडून वसूल करतात. अनेक कंपन्या आणि कृषी सेवा केंद्राचे चालक त्यांना औषधं खपविण्यासाठी कमिशन देतात. त्यामुळे बोगस सल्लागारांचा हा धंदा आता चांगलाच भरभराटीला आलाय.

शेतीतील या बोगस डॉक्टरांना रोखणारी कोणतीही व्यवस्था किंवा कायदा सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनीच अशा स्वयंघोषित सल्लागारांपासून दूर राहण्यातच शहाणपण आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live