शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणं, तब्बल सव्वाशे कोटींचा फटका 

साम टीव्ही
मंगळवार, 23 जून 2020
  • शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणं
  • शेतकऱ्यांना तब्बल सव्वाशे कोटींचा फटका 
  • शेकडो शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी 

सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. पेरलेलं बियाणं उगवलंच नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय.

मराठवाड्यात वेळेवर पाऊस आल्यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीनचं बियाणं बोगस निघाल्यानं ते उगवलंच नसल्याचा प्रकार उघड झालाय. या संकटामुळे किमान एक ते दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागणारंय. 

कमी पाण्यावर अल्पावधीत येणारं पीक म्हणून मराठवाड्यात सोयाबीनचं पीक प्राधान्यानं घेतलं जातं. मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि लातूर या दोन विभागांत जवळपास ४८ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होते. यात जवळपास १७ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी अपेक्षित आहे. त्यातील ५० ते ५५ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केलीय. मात्र, त्यापैकी १५ ते १८ टक्के शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही. 

मराठवाड्यात सर्वाधिक ९९४ तक्रारी उस्मानाबाद जिल्ह्यातून आल्यात. बीड जिल्ह्यात ६५० तर नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ४६७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात. परभणीत १८०, हिंगोलीत ८० तक्रारी आल्यात. तर, लातूर जिल्ह्यात ७१ आणि जालना जिल्ह्यात १५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात.  

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शक्यतो डबल लेबल असणारं बियाणंच खरेदी करावं, असं आवाहन कृषी विभागानं केलंय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live