फास्टॅगसाठी नागरिकांकडून अतिरीक्त कराची वसुली

फास्टॅगसाठी नागरिकांकडून अतिरीक्त कराची वसुली

पिंपरी- केंद्र सरकारने महामार्गावर टोल भरण्यासाठी फास्टॅग बसविणे अनिवार्य केले असले, तरी हा टॅग घेण्यासाठी ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या रकमेत तफावत असल्याचे आढळले आहे.

सध्या फास्टॅग बसविण्यासाठी काही ठिकाणी ५०० रुपये आकारण्यात येत आहेत. त्यात मोबाईलवरील बॅंक ॲपवरूनही ४९९ रुपये द्यावे लागत आहेत. तर टोलनाक्‍याच्या परिसरात काहींनी ही सुविधा उपलब्ध करून दिली असून तेथे ६०० रुपये आकारले जात आहेत. नव्या गाडीची खरेदी करताना शोरुमचालक फास्टॅग लावूनच देत आहेत. त्यासाठी ७०० ते ८०० रुपये आकारले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. आहे. तर बॅंकेमध्ये फास्टॅगसाठी आकारण्यात येणारी रक्‍कम चारशे रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये २०० रुपये डिपॉझिटचे आणि २०० रुपये टॅगचे आहेत. बॅंका टॅग ॲक्‍टिव्हेशनची रक्‍कम आकारत नसल्याचे सांगण्यात आले. बॅंकेमध्ये अर्ज केल्यानंतर फास्टॅग मिळण्यासाठी आठ दिवस लागत आहेत. तर टोल नाक्‍याच्या परिसरात हे टॅग तत्काळ उपलब्ध होत असून त्याचे ॲक्‍टिव्हेशनही तत्काळ होत आहे. वाहनचालकांना फास्टॅगची नेमकी रक्कम माहीत नसल्याने त्यांची फसवणूक होत आहे. 

बॅंकेतूनच घ्या फास्टॅग
फास्टॅग घेण्यासाठी आपले खाते असलेल्या बॅंकेत ही प्रक्रिया पूर्ण करा. यामुळे प्रवास करताना टोलसाठी तुमच्या खात्यातून किती रक्‍कम वळती झाली याची माहिती राहील. याच बॅंकेत आपले केवायसी पूर्ण झालेले असते. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोईस्कर होते. फास्टॅगच्या प्रक्रियेला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी टोल नाक्‍यावर चार लेनमध्ये फास्टॅगची यंत्रणा सुरू झाली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा परिसरात असणाऱ्या टोलनाक्‍यावर फास्टॅग लावलेल्या वाहनांसाठी दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येकी एक लेन पुण्याहून मुंबईकडे आणि मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी आहे. उर्वरित लेनमध्येही फास्टॅग यंत्रणा बसवण्याचे काम सुरू असून महिनाअखेर हे काम पूर्ण होईल.

टॅगचा तुटवडा?
वाहनांना लावण्यात येणाऱ्या टॅगचा सध्या तुटवडा असल्यामुळेच सरकारने ही मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढवल्याची चर्चा सुरू आहे. बॅंकेमध्ये टॅग मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतरही त्याला आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत आहे. 

Web Title: Fastag was a robbery of citizens

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com