कोरोनासोबत पावसाळ्यातील आजारांचंही संकट, साचलेल्या पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती

साम टीव्ही
रविवार, 5 जुलै 2020
  • कोरोनासोबत पावसाळ्यातील आजारांचंही संकट
  • साचलेल्या पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती
  • मुंबईकरांनो येणारा काळ कठीण, काळजी घ्या

 

आता मुंबईकरांना सावधान करणारी एक महत्वाची बातमी, कोरोनासोबतच पावसाळ्यातील इतर आजारांशीही आता तुम्हांला मुकाबला करावा लागणारय. एखादी जखम घेऊन तुम्ही पावसाच्या पाण्यातून चाललात तर तुम्हाला लेप्टो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. 

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. त्यामुळे मुंबईकरांच्या काळजीत भर पडलीय. त्यात आता आणखी एक संकट डोकं वर काढू पाहतंय. ते आहे लेप्टोस्पायरोसिस या आजाराचं. मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. आणि ज्या ज्या वेळी मुंबईला पावसानं झोडपून काढलं त्यानंतर मुंबईत लेप्टोचे रूग्ण वाढल्याचा अनुभव आहे. *लेप्‍टोस्‍पायरोसीस हा रोगजंतुमुळे होणारा आजार आहे.  रोगबाधीत प्राण्यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. एखादी जखम झालेली व्यक्ती या लघवीने दुषित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आली तर लेप्टोचा संसर्ग होऊ शकतो.*

ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव ही या आजाराची मुख्य लक्षणं आहेत. रुग्णांना श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणं, मूत्रपिंड आणि यकृत निकामी होणं, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो.
 

आधीच कोरोनामुळे मुंबईकरांचं जगणं असह्य झालंय. त्यात आता लेप्टोची टांगती तलवार त्यामुळे प्रत्येकानं स्वत:ची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तुमचा निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर बेतू शकतो. 


संबंधित बातम्या

Saam TV Live