FIFA18 : महिनाभर जगावर चढणार फुटबॉलचा रंग

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 जून 2018

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या महाकुंभास उद्या गुरुवारी खेळाप्रमाणेच "ब्युटिफूल' सुरवात होईल. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात उद्‌घाटनाचा सामना होणार असून, त्यापूर्वी अवघ्या 30 मिनिटांचा उद्‌घाटन सोहळा पार पडेल. 

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या महाकुंभास उद्या गुरुवारी खेळाप्रमाणेच "ब्युटिफूल' सुरवात होईल. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात उद्‌घाटनाचा सामना होणार असून, त्यापूर्वी अवघ्या 30 मिनिटांचा उद्‌घाटन सोहळा पार पडेल. 

येथील लुझ्नीकी स्टेडियमवर हा सोहळा आणि सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय संगीतकार आणि गायक रॉबी विल्यम्स या वेळी आपल्या आवाजाची मोहिनी मैदानावरील उपस्थित प्रेक्षक आणि टी.व्ही.वरून आनंद घेणाऱ्या फुटबॉल चाहत्यांवर टाकणार आहे. रशियाची सुप्रसिद्ध गायिका आयडा गॅरीफुलिना हिची त्याला साथ मिळणार आहे. या दोघांच्या संगीतावर थिरकत असतानाच जवळपास 500 कलाकारांचा नृत्याविष्कारही पहायला मिळणार आहे. यामध्ये जिम्नॅस्ट आणि ट्रॅम्पोलिन खेळाडूंचाही सहभाग असेल. या सगळ्या उद्‌घाटन सोहळ्यावर अर्थातच रशियाची छाप असेल. फुटबॉल सम्राट पेले अनुपस्थित राहणार असले तरी, ब्राझीलचाच दोन वेळचा विजेता रोनाल्डो या वेळी सहभागी खेळाडूंना विजेतेपदाची प्रेरणा देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. 

या वेळी जर्मनी, ब्राझील, अर्जेंटिना, स्पेन, बेल्जियम या संघांच्या नावांना पसंती मिळत असली, तरी अंदाज वर्तवणे सर्वांनाच कठिण जात आहे. जर्मनीला लागोपाठ दुसऱ्यांदा विश्‍वकरंडक जिंकून ब्राझीलच्या पाच विजेतेपदाची बरोबरी करण्याची संधी आहे. ब्राझील संघाच्या कामगिरीत चढउतार असले, तरी रशियात पाऊल ठेवल्यापासून हा संघ चाहत्यांच्या नजरेत भरत आहे. दुखापतीतून बरे झाल्याचे नेमारने सराव सामन्यातून सिद्ध केल्यामुळे ब्राझील संघ जोशात आला आहे असे म्हणायला जागा आहे. सध्याच्या फुटबॉल विश्‍वात चर्चेत असणाऱ्या मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या अर्जेंटिना आणि पोर्तुगाल संघांना तेवढी पसंती मिळत नाही. या दोन्ही देशांची सगळी मदार या दोन खेळाडूंच्याच फॉर्मवर अवलंबून राहणार आहे. 

स्पर्धेतील यशा अपयशावर खेळाडू आणि प्रशिक्षकांचे भवितव्य अवलंबून असते. या वेळी मात्र स्पर्धा सुरू होण्यास चोवीस तास असतानाच स्पेनने आपल्या जुलेन लोपेटेगुई या मुख्य प्रशिक्षकांची हकालपट्टी केली आहे. स्पर्धा तोंडावर असताना रेयाल माद्रिदशी करार केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live