नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता २५० रुपये दंड

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

नवी मुंबई : स्वच्छतेत नवी मुंबई शहराला देशात अग्रस्थानी आणण्यासाठी नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह घनकचरा विभागाने कंबर कसली आहे. रस्ते, पदपथ, पानटपऱ्यांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्याची तयारी घनकचरा विभागाने केली आहे. मिसाळ यांच्या आदेशानंतर पुढील आठवड्यात याबाबत नोडनिहाय विविध पथके तयार केली जाणार आहेत. 

नवी मुंबई : स्वच्छतेत नवी मुंबई शहराला देशात अग्रस्थानी आणण्यासाठी नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह घनकचरा विभागाने कंबर कसली आहे. रस्ते, पदपथ, पानटपऱ्यांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्याची तयारी घनकचरा विभागाने केली आहे. मिसाळ यांच्या आदेशानंतर पुढील आठवड्यात याबाबत नोडनिहाय विविध पथके तयार केली जाणार आहेत. 

शहर सुशोभीकरणासोबतच शहरातील नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी, यासाठी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दणका देण्याचा निर्णय घेतला आहे. पान-तंबाखू चघळत अगदी सहजपणे वाट्टेल तिकडे थुंकणाऱ्यांना आता रक्कम मोजावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांवर जरब बसवण्यासाठी पानटपऱ्यांच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना अडीचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. सध्या ही प्राथमिक स्वरूपाची कारवाई असल्यामुळे अडीचशे रुपयांचा दंड निश्‍चित केला आहे; मात्र कारवाईचे प्रमाण व त्यामुळे होणारा परिणाम लक्षात घेऊन दंडाची रक्कम भविष्यात वाढण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील अनेक जागा थुंकणाऱ्यांमुळे खराब झाल्याचे घनकचरा विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पथकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत कारवाई सुरू केली जाणार आहे. गेल्या वर्षी स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेतील सर्व टप्प्यात नवी मुंबई शहराने देशातील नामवंत शहरांना सहज मागे टाकले होते. 

राजकीय हस्तक्षेप
तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी असताना स्वच्छता उपविधी आणली होती. यात दंडाची रक्कम एक हजारपेक्षा जास्त आकारण्यात आली. ही उपविधी गेल्या काही महिन्यांपूर्वीच नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मंजूर केली; मात्र ऐन निवडणुकीत लोकांचा राग ओढवला जाऊ नये, या भीतीपोटी नव्या दंडात्मक नियमांची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला अप्रत्यक्षरीत्या मनाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सार्वजनिक जागेवर व पानटपऱ्यांवर थुंकून घाण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील नागरिकांना शिस्त लागावी याकरिता रिक्षावर जनजागृतीपर संदेश दिले जाणार आहेत. - तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा.


संबंधित बातम्या

Saam TV Live