कोकणातल्या गणेशोत्सवाचा तिढा वाढला, वाचा काय आहेत नवीन नियम?

साम टीव्ही
सोमवार, 20 जुलै 2020
  • कोकणातल्या गणेशोत्सवाचा तिढा वाढला
  • गावी येण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन
  • क्वारंटाईनच्या पालनाबाबत ग्रामपंचायती ठाम

विघ्नहर्ता गणेशाच्या कोकणातल्या भक्तांवरही यंदा कोरोनामुळे नवंच संकट आलंय. यंदाच्या गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हं आहेत.

कोकणातील काही गावांच्या ग्रामपंचायतींनी गणपतीला गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जारी केलीय. गणपतीला गावी यायचं असेल तर गणेश चतुर्थीपुर्वी पंधरा दिवस गावात दाखल होऊन १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्याची अट घातली गेलीय. 

गणेशोत्सवाला २२ ऑगस्टपासून सुरूवात होतेय. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने मुंबई-पुण्याकडच्या चाकरमान्यांना 7 ऑगस्टपर्यंत गावात येण्याची अट घातलीय. 7 ऑगस्टनंतर येणाऱ्यांना प्रति माणशी १००० रुपयांचा दंड आकारण्याचा ठराव या ग्रामपंचायतीने केलाय. तर सिंधुदुर्गातल्या बांद्याजवळील रोणापाल गावानेही हेच नियम चाकरमान्यांसाठी लागू केलेत. शिवाय नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम कृती दलही स्थापन केलंय. 
मात्र क्वारंटाईनचा कालावधी 14 वरून 7 दिवसांचा करावा, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केलीय. तर भाजप आमदार नितेश राणेंनी गणेशोत्सवासाठी क्वारंटाईनचा नियम रद्द करण्याची मागणी केलीय. यावर आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतंय, त्याकडे चाकरमान्यांचं लक्ष लागलंय. मात्र क्वारंटाईनच्या कालावधीबाबत ग्रामपंचायतीची भूमिका ठाम राहिल्यास कोकणात गणेशोत्सवापुर्वी शिमगा रंगणार हे मात्र नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live