मुंबईकरांना आता मोबाईलवर मिळणार हवामानात झालेले पंधरा-पंधरा मिनिटांचे अपडेट्स

मुंबईकरांना आता मोबाईलवर मिळणार हवामानात झालेले पंधरा-पंधरा मिनिटांचे अपडेट्स

पुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने "वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले आहे. त्यातून प्रत्येक पंधरा मिनिटांनी एक किलोमीटरच्या आतील हवामानाचा अंदाज मिळेल. मुंबईमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर चेन्नई, कोलकता अशा मोठ्या शहरांमध्ये हा राबविण्यात येणार आहे. 

मुंबईत काही भागांत जेमतेम पाऊस पडतो, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होते, त्यामुळे शहराच्या कोणत्या भागात नेमके कसे वातावरण असेल, याची अद्ययावत अचूक माहिती देण्यासाठी हवामान विभागाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत सहा रडारच्या मदतीने मुंबईच्या आकाशाचे सातत्याने निरीक्षण टिपण्यात येणार आहे. त्याचे विश्‍लेषण करून दिलेला अंदाज "वेदर लाइव्ह'च्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोचविण्यात येईल. 

याबाबत भारतीय हवामान विभागाच्या पश्‍चिम विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर म्हणाले, "हवामानातील निरीक्षण नोंदविण्यासाठी सध्या मुंबईत 30 स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. तसेच, मुंबई महापालिकेची 70 पर्जन्यमापक केंद्रे आहेत, त्यामुळे शहरातील प्रत्येक भागातील हवामानाच्या नोंदी घेण्यासाठी आणखी शंभर केंद्रांची गरज आहे. ती उभारण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांनी मदत घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत रेल्वेच्या पश्‍चिम विभागाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. तसेच, पूर्व विभागाशी चर्चा सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे महापालिकेच्या आयुक्तांबरोबरही चर्चा झाली आहे. महाविद्यालयांचीही मदत यात घेतली जात आहे. या माध्यमातून दोनशे केंद्रे उभारण्यात येतील, त्यामुळे शहराच्या कोणत्या भागात नेमका किती पाऊस पडला याची अचूक माहिती मिळेल.'' 

रडार टिपणार मुंबईची निरीक्षणे 

"पूर्वी एकाच रडारमधून मुंबईच्या आकाशाची निरीक्षणे टिपण्यात येत होती. आता उंच इमारतींमुळे आकाशातील निरीक्षणे टिपण्यात रडारला अडथळा येत आहे. त्यामुळे मुंबईसाठी चार डॉपलर रडार केंद्र सरकारने दिले आहेत. नवी मुंबई, ठाणे येथे प्रत्येकी एक, तर दोन रडार मुंबईमध्ये उभारण्यात येणार आहेत. कुलाब्याला अजून एक रडार आहे. याशिवाय समुद्रावरच्या हवामानाची निरीक्षणे नोंदविण्यासाठी आणखी एक रडार असेल. अशा पद्धतीने सहा रडार आणि दोनशे पर्जन्यमापक केंद्रांच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेली माहिती संकेतस्थळ आणि ऍपवरून मुंबईकरांपर्यंत पोचविण्यात येईल,'' असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com