शिवसेनेला विरोध करणं हर्षवर्धन जाधव यांना भोवणार ?

शिवसेनेला विरोध करणं हर्षवर्धन जाधव यांना भोवणार ?

औरंगाबादः कन्नड विधानसभा मतदारसंघात अपक्ष हर्षवर्धन जाधव, शिवसेनेचे उदयसिंह राजपूत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोल्हे यांच्यात अतिशय अटीतटीची निवडणूक झाली आहे . 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन केलेली टिकाच माजी आमदार व कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना भोवण्याची शक्‍यता आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी " हर्षवर्धन जाधव को जीताओ' हे केलेले आवाहन कितपत प्रभावी ठरेल याबाबत शंका आहे.  राष्ट्रवादीकडे वळलेल्या मुस्लिम मतदारांना जलील हर्षवर्धन यांच्याकडे कितपत वळवू शकतील हे पाहणे महत्वाचे ठरेल .

जिल्ह्यातील चुरशीच्या लढतीपैकी एक असलेला कन्नड-सोयगांव मतदारसंघ खऱ्या अर्थाने चर्चेत आला तो लोकसभा निवडणुकीपासून. हर्षवर्धन जाधव यांच्या बंडखोरीने शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले, तेव्हापासून ! विधानसभा निवडणुकीत सगळ काही सुरळीत सुरू असतांना हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा टायमिंग साधत शिवसेनेला अंगावर घेतले आणि राज्यभरात स्वतःची चर्चा घडवून आणली.

पण क्षणिक मिळालेली ही प्रसिध्दीच आता हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. कन्नडमध्ये शिवसेनेचे उदयसिंग राजपूत, अपक्ष हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे संतोष कोल्हे यांच्यात तिरंगी लढत आहे. वडिलोपार्जित पंरपरागत मतदान हे हर्षवर्धन जाधव यांचे बलस्थान समजले जाते. पण लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवाला कारणीभूत ठरल्यामुळे हा मतदार देखील जाधव यांच्यापासून दुरावल्याचे बोलले जाते.

ऐन निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर करत त्यांना निवडून  आणण्याचे केलेले आवाहन मुस्लिम मतदारांना  जाधव यांच्याकडे कितपत प्रभावी ठरते हे लवकरच कळेल  . शिवसेनेच्या पराभवासाठी जाधव यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली होती असे आरोप शिवसेनेने केले होते . यावर इम्तियाज यांच्या पाठिंब्याने शिक्कामोर्तब झाले आणि त्याचा फटका जाधव यांना बसेल असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे . शिवाय भाजप बंडखोर किशोर पवार यांना मिळणारी मते ही देखील जाधव यांच्यासाठीच डोकेदुखी ठरू शकतात.

शिवसैनिक पेटून उठले..

लोकसभा निवडणुकीपासून तालुक्‍यातील शिवसैनिकांमध्ये जाधव यांच्या विरोधात रोष होता. त्यात सत्तार यांचे उदाहरण देत प्रचारा दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टिकेने वाढ झाली. त्यामुळे शिवसैनिकांनी चवताळून जाधव यांच्या विरोधात कंबर कसली. इम्तियाज यांच्या पाठिंब्याने तर शिवसैनिक आणखीनच पेटले. शिवाय पाचव्यांदा निवडणुक लढवणारे उदयसिंग राजपूत यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली सहानुभूती महत्वाची ठरेल.

कोल्हे कोणाला हादरा देणार?

शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छूक असलेले कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांना ऐनवेळी राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन मैदानात उतरवले. कोल्हे यांच्या उमेदवारीने आधी थेट होणारी लढत तिरंगी झाली. शरद पवार यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. कोल्हे यांच्या उमेदवारीने काही प्रमाणात शिवसेना व अपक्ष जाधव यांची मते त्यांच्याकडे वळू शकतात.

तालुक्‍यात मराठा, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम अशी मतांची क्रमवारी आहे. मराठा आणि ओबीसी समाजची मते ही शिवसेनेची पारंपारिक मत समजली जातात. यावेळी मराठा मते राष्ट्रवादीकडे अधिक वळलेली दिसली . हर्षवर्धन जाधव यांच्या पाठोपाठ शिवसेनेलाही काही मते मिळाली असावीत अशी चर्चा आहे . कोल्हे यांना माळी मते अधिक मिळण्याची शक्यता आहे . 

मतदारसंघात 68 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. एकूण 3 लाख 14 हजारांपैकी 2 लाख 14 हजार इतके मतदान झाले आहे. साठ हजाराहून अधिक मत मिळवणारा उमेदवार तालुक्‍याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

शिवसेनेच्या विरोधात केलेले विधान, एमआयएमने जाहीर केलेला पाठिंबा, बंडखोर किशोर पवार यांची उमेदवारी, कोल्हेंनी जाधव यांच्या मतांवर मारलेला डल्ला पाहता जाधव यांची विधानसभेची वाट यावेळी बिकट दिसते.

याउलट लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेबद्दल असलेली सहानुभूती या पक्षाला पुन्हा विजय मिळवून देईल असे दिसते. दुसऱ्या क्रमाकांवर जाधव-कोल्हे यांच्यापैकी कोण असेल याबद्दलच सध्या कन्नडमध्ये चर्चा होतांना दिसते.  

Web Title : harshvardhan Jadhav Oppose Shivsena In kannad

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com