कोकणात आज अतिवृष्टीची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 जुलै 2019

पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राजस्थान, पंजाब, हरियाना राज्यांचा काही भाग वगळता देशातील उर्वरित भाग नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) व्यापला आहे. येत्या दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण पंजाब, हरियाना व्यापून राजस्थानच्या आणखी काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

दरम्यान, कोकण-गोव्यात पावसाचा जोर कायम असला, तरीही मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाची उघडीप असून, तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शनिवारी कोकणात माथेरान, दोडामार्ग, उल्हासनगर, वसई, कर्जत, अंबरनाथ, खालापूर, पनवेल परिसरात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. तर, मध्य महाराष्ट्रात महाबळेश्‍वर, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, गगनबावडा, राधानगरी, वेल्हा येथेही पावसाने दमदार हजेरी लावली. पुणे आणि परिसरातही दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरी अधूनमधून हजेरी लावत होत्या. 

चिपळूण-खेडमध्ये नद्यांचे पाणी 
खेड व चिपळूण तालुक्‍यांना आज सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले. वाशिष्ठी नदीपात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिसरातील शेतातही नदीचे पाणी घुसले होते. खेड-भरणे मार्गावरील गटार तुंबल्यामुळे महाड नाक्‍यानजीकच्या रस्त्यावर पाणी आले होते.

‘कोयनेचे बंद वीज प्रकल्प सुरू करा’
कोयनानगर  - कोयना धरणात दमदार पाऊस सुरू असून, यामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा होत आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने गेल्या ३८ दिवसांपासून राज्य शासनाच्या आदेशाने बंदीचा शॉक बसलेले पश्‍चिमेकडील वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी महानिर्मिती कंपनीने कोयना प्रकल्प व राज्य शासनाला पत्राद्वारे केली आहे.

कोयना धरणात मे महिन्यात १० टक्के पाणीसाठा असल्याने ३१ मे रोजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार वीजनिर्मिती बंद करण्यात आली होती. चिपळूण व दाभोळ परिसरात पाणीटंचाई भासू नये, यासाठी पश्‍चिमेकडील कोयना जलविद्युत प्रकल्पाचे टप्पा १,२,३ हे प्रकल्प कमी दाबाने कार्यान्वित होते. १,९५६ मेगावॅट क्षमता असणाऱ्या प्रकल्पातून ९५ टक्के वीजनिर्मिती बंद, तर पाच टक्के सुरू होती. उद्योग विश्वाच्या संवेदना जपणारा १,००० मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा बंद असल्याने वीज निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. यामुळे गेली ३८ दिवस बंद असलेले वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी महानिर्मिती कंपनीने राज्य शासनाला व कोयना प्रकल्पाला लेखी पत्र देऊन केली आहे.

 

Web Title: Heavy Rain Monsoon Konkan


संबंधित बातम्या

Saam TV Live