न झोपणारं मुंबई शहर जोरदार पावसाने झोपलं..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 जुलै 2019

मुंबई : मुंबई शहर व उपनगराला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर, मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा पूर्णपण विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

नवी मुंबईतीलही शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दादर, सायन, लालबाग, मुलुंडमधील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. तर, वाकोला पोलिस ठाणे पाण्यात शिरले आहे. उपनगरी रेल्वे सेवेचा 30 जून आणि 1 जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने पुरता बोजवारा उडाला आहे. सोमवारी सकाळपासूनचा त्रास कमी होता की काय म्हणून रात्री साडेअकरानंतर मध्य आणि हार्बर रेल्वेच्या ठिकठिकाणच्या रुळावर पाणी साचल्याने सर्व लोकल जाग्यावरच अनिश्चत काळासाठी अडकून पडल्या. त्यामुळे रात्रीची ड्युटी करून घरी परतणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. 

अतिवृष्टीमुळे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई व कोकण परिसरातील सर्व पालिका, सरकारी व खासगी शाळांना आज सुटी जाहीर केली आहे. सध्या मुंबईत सगळे व्यवहार ठप्प झाले असून, शाळे पाठोपाठ सरकारी कर्मचाऱ्यांनाही रजा घोषित करण्यात आली आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरकारने मुंबईतील सर्व कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर केली आहे. 

सलग चौथ्या दिवशी ही पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरुच आहे. येत्या 24 तासात पालघर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर जिल्ह्यातील सुर्या आणि वैतरणा या नद्यांना मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा नागरिकांनी घरीच राहावे अस आवाहान जिल्हाप्रशासनाकडून देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live