कोकणात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

कोकणात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

पुणे -  कोकणात पुढील दोन दिवस अतिवृष्टी होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने रविवारी वर्तविला. यामुळे कोकणातील प्रशासनाला दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता असून, मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची हजेरी लागेल, असेही खात्याने म्हटले आहे.

देशातील ३६ पैकी चार म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे हवामान विभाग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी कोकणात पुढील दोन दिवसांमaध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबईसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ म्हणजे दक्ष राहण्याचा इशारा हवामान खात्याने प्रशासनाला दिला आहे. कोकणात येत्या सोमवारी (ता. ८) आणि मंगळवारी (ता. ९) अतिवृष्टीची शक्‍यता आहे. गोवा, गुजरातचा काही भाग, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार येथेही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

कोकणात गाठली सरासरी
कोकणात गेल्या आठवड्यापासून दमदार पाऊस पडत असल्याने तेथे पावसाने सरासरी ओलांडली. तेथे १ जून ते ७ जुलैदरम्यान ९४७ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा सरासरीपेक्षा ११ टक्के जास्त म्हणजे १ हजार ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, राधानगरी, कोयना, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. राज्यात उशिरा दाखल झालेला मॉन्सून आणि त्यानंतर अडखळत झालेला प्रवास यामुळे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

मराठवाडा आणि विदर्भ कोरडा
राज्यात गेल्या वर्षभरापासून दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यात यंदा पावसाळ्यात ११४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या भागात ७ जुलैपर्यंत १७५ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा मात्र सरासरीच्या तुलनेत उणे ३४ टक्के पावसाची, तर विदर्भात सरासरीच्या उणे २० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: heavy rain warning in Konkan for two days

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com