भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत अवस्थेत -अभिजित बॅनर्जी

भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत अवस्थेत -अभिजित बॅनर्जी

नवी दिल्ली : अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळालेले भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत असून, मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे. सध्याची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईत जन्मलेले भारतीय वंशाचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी इस्थर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचा अर्थशास्त्रातील "नोबेल' पुरस्कार जाहीर झाला आहे. तिन्ही अर्थतज्ज्ञांना हा पुरस्कार विभागून दिला जाणार आहे. 'जगातून दारिद्य्राचे निर्मूलन व्हावे म्हणून केलेल्या संशोधनाबद्दल बॅनर्जी, डफलो आणि क्रेमर यांना 2019 साठीच्या अर्थशास्त्रातील 'नोबेल' पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे,' असे रॉयल स्वीडिश अकादमीने म्हटले आहे. बॅनर्जी (वय 58) आणि डफलो (वय 46) हे पती-पत्नी जोडपे अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेत अध्यापनाचे काम करते. तर, क्रेमर (वय 54) हे हार्वर्ड विद्यापीठात अध्यापन करतात. 

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आणलेल्या न्याय योजनेचे शिल्पकार म्हणून अभिजित बॅनर्जी यांची ओळख आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला बॅऩर्जी यांनी खूप विरोध केला होता. आता बॅनर्जी यांनी अर्थव्यवस्थेवरून सरकारला लक्ष्य केले आहे.

कोण आहेत अभिजित बॅनर्जी? 
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ असलेल्या 58 वर्षीय बॅनर्जी यांनी कोलकता विद्यापीठ आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले असून, हार्वर्ड विद्यापीठातून 1988 मध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. बॅनर्जी हे एमआयटीत फोर्ड फाउंडेशन आंतरराष्ट्रीय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डफलो आणि सेंधील मुल्लैनाथन यांच्या साथीने बॅनर्जी यांनी 2003 मध्ये अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी ऍक्‍शन लॅबची (जे-पीएएल) स्थापना केली आहे. बॅनर्जी हे सुरवातीपासून "जे-पीएएल'चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. 2015 नंतरचा विकासाचा अजेंडा ठरविण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) सरचिटणीसांनी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे सदस्य म्हणूनही बॅनर्जी यांनी काम केले आहे.

थेट लाभदायी संशोधन! 
या तिन्ही तज्ज्ञांनी केलेले संशोधनाचे निष्कर्ष आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सुरू असलेल्या संशोधनकार्यामुळे गरिबीच्या विरोधातील लढा अधिक प्रभावी होण्यास मदत झाली आहे, अशा शब्दांत अकादमीने या तिघांच्या कामाचे कौतुक केले आहे. पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या तज्ज्ञांच्या एका अभ्यासावर आधारित असलेल्या मूलभूत शिक्षणाशी संबंधित कार्यक्रमाचा लाभ पाच कोटींहून अधिक भारतीय मुलांना झाला आहे. आज अनेक देशांमध्ये वैद्यकीय सेवांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. याबाबतचे या तिघा तज्ज्ञांचे संशोधन प्रभावी ठरले आहे. 
Web Title: How Nobel Winner Abhijit Banerjee Described State Of Indian Economy

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com