पाहा, खासगी रुग्णालयं कशी करताय रुग्णांची लूट

साम टीव्ही
रविवार, 21 जून 2020
  • खासगी रूग्णालयं बनली लुटीचा अड्डा
  • कोरोनाच्या आडून लाखोंची वाटमारी 
  • मुख्यमंत्री महोदय आता इशारा नको, कारवाई कराच

कोरोनासंकटाच्या काळात खासगी रूग्णालयं अक्षरश: लुटीचा अड्डा बनलीयेत. अनेक रूग्णांना ICU बेड नाकारले जातायेत. तर उपचाराच्या नावावर एकेका रूग्णाकडून 3 ते 4 लाख रूपये लुटले जातायेत. सरकारी आदेश धाब्यावर बसवत हा सगळा गोरखधंदा सुरूंय. 

कोरोनासंकटामुळे सर्वसामान्य जनता पुरती हतबल झालीय. एकीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न तर दुसरीकडे कोरोनाचं संकट. त्यातही एखादा सर्वसामान्य रूग्ण खासगी हॉस्पिटलची पायरी चढलाच तर उपचार नको मरणच बरं अशी अवस्था याला कारणीभूत ठरलीय खासगी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेली लुटमार मुंबई, नवी मुंबईतील अनेक खासगी रूग्णालयांनी सरकारी आदेशांना धाब्यावर बसवत मनमानी कारभार सुरू केलाय. रूग्णाची आर्थिक स्थिती पाहून त्याला ICU बेड नाकारले जातायेत. तर ज्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करून घेतलं जातं त्यांची आर्थिक पिळवणूक केली जातीय. आधी 1 लाख डिपॉझिट आणि नंतर 4 ते 5 लाखांचं बिल....माणुसकीलाही लाज वाटावी इतक्या खालच्या थराला जाऊन ही खासगी हॉस्पिटल्स रूग्णांची लूट करू लागलीयेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरात असे अनेक रूग्ण आहेत जे या पांढरपेशा वर्गाच्या लुटीनं नाडले गेलेत. 
आता पाहूयात खासगी रूग्णालयांतील उपचाराबाबत सरकारी नियम काय सांगतो  खासगी रुग्णालयातील लुटीला चाप घालण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी 30 एप्रिल रोजी एक आदेश जारी. एपिडेमिक ऍक्ट 1897 तसंच आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 आणि अन्य कायद्यांच्या आधारे रुग्णालयांनी बेड चार्ज पासून विविध आजारांवरील उपचारासाठी किती रक्कम आकारावी याविषयी काही नियम आखून देण्यात आले आहेत. जनरल वॉर्डात बेडसाठी 4000, अतिदक्षता विभागात 7000 आणि व्हेंटिलेटर वरील रुग्णांसाठी 9000 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय शस्त्रक्रिया तसेच अन्य आजारांवरील उपचारासाठी किती दर आकारावे त्याचीही यादी या 30 एप्रिलच्या आदेशात आरोग्य विभागाने दिलीय. 

मात्र सरकारच्या या आदेशाला खासगी रूग्णालयांनी केराची टोपली दाखवलीय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रत्येक पत्रकार परिषदेवेळी खासगी रूग्णालयांची गय केली जाणार नाही या वाक्याचा पुनरूच्चार करतायेत. मात्र तरीही खासगी रूग्णालंय जनतेची लूट करत असतील तर सरकारी आदेशांना काहीच किंमत नाही का? असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मंत्र्यांनी आता फुसके बार सोडण्याऐवजी खासगी हॉस्पिटलवर आसूड ओढायलाच हवे. त्याशिवाय ही लूटमार थांबणार नाही. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live