इंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही - नितीन गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 जानेवारी 2019

नागपूर :  इंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही. महिला असूनही त्यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवीले. त्यांना आरक्षण मिळाले होते काय? असा सवाल करीत भाजप नेते नितीन गडकरी यांनी स्वकर्तृत्वाने वजन वाढविले पाहिजे, असा सल्ला महिलांना दिला. 

नागपूर :  इंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही. महिला असूनही त्यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवीले. त्यांना आरक्षण मिळाले होते काय? असा सवाल करीत भाजप नेते नितीन गडकरी यांनी स्वकर्तृत्वाने वजन वाढविले पाहिजे, असा सल्ला महिलांना दिला. 

नागपूर महापालिकेने दिव्यांगांना ई-रिक्षाचे वितरण केले. शोषितांचे अश्रू पुसणे हे सर्वोत्तम काम असून राजकारणाऐवजी मी हेच करतो, असे नमुद करीत केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी समाजातील मागासलेल्यांना सवलती दिल्याच पाहिजे, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वकर्तृत्वाने आपले वजन वाढविले पाहिजे, असा सल्लाही महिलांना दिला. 

महापालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने रेशिमबाग मैदानावर आयोजित उद्योजिका मेळाव्याचे थाटात उद्‌घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर कोहळे, सुनील अग्रवाल, नागेश सहारे, दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे, रुपाली ठाकूर यांच्यासह इतर नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी गडकरींच्या हस्ते एका महिलेसह चार दिव्यांगांना ई-रिक्‍शा वितरित करण्यात आले.

गडकरी म्हणाले, कुठलीही वस्तु, पदार्थ तयार करताना त्याचा योग्य फॉर्म्युला तयार करणे आवश्‍यक आहे. नागपूरच्या सावजी मटनची चव स्वर्गीय सुखाचा आनंद देते. कुठलीही वस्तू तयार करण्याचा अचूक 'फॉर्म्युला' म्हणजेच कौशल्य असून ते आत्मसात करणे ज्याला जमले, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. अशा वस्तु तयार करा, त्या खरेदीसाठी रांगा लागल्या पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी महिलांना केले. महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु काही दिवसांपूर्वी पत्नीपिडीत भेटले, असे सांगताच हशा पिकला. घरी जशी सांबारवडी तयार होते, तशी चव कुठेही चाखायला मिळाली नाही, असे नमुद करीत गडकरी यांनी यावेळी सौभाग्यवतींची स्तुती केली. नुकताच अनिल कपूर, जॅकी श्रॉफ घरी आले असता त्यांनी जेवणाऐवजी सांबारवडीवरच ताव मारला, असेही गडकरी म्हणाले. यश व पुस्तकी ज्ञानाचा संबंध नाही, अनुभवातून मोठे होता येते. महिलांना अनुभवाची संधी दिली तर त्यांचे सक्षमीकरण होईल, असेही ते म्हणाले. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी महिला उद्योजिका झाल्यास मुलेही उद्योजक होतात व कुटुंबाचे नाव होते, असे सांगितले. प्रास्ताविकातून प्रगती पाटील यांनी महिला व बालकल्याण समितीच्या महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. 

पाच महिलांचा गौरव 
यावेळी शहरातील पाच महिलांचा गौरव गडकरींच्या हस्ते करण्यात आला. यात बेवारस श्‍वानांची सुश्रूषा करणाऱ्या स्मिता मिरे, साहसी खेळात तरबेज गौरी डोळस, मुस्लिम महिलांसाठी काम करणाऱ्या रुबीना पटेल, महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या संगीता राऊत व इंजिनिअरिंग झालेली मूक बधिर विद्यार्थिनी श्रीया खानझोडे यांचा समावेश आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live