शाळा उघडल्यास कोरोनाचा विस्फोट? दक्षिण कोरियाचा संशोधनांती दावा

साम टीव्ही
मंगळवार, 21 जुलै 2020
  • शाळा उघडल्यास कोरोनाचा विस्फोट?
  • दक्षिण कोरियाचा संशोधनांती दावा
  • शाळांमधून होऊ शकतो समूह संसर्ग
     

लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील महिन्यापासून अनेक भागातील शाळा सुरू करण्याचं नियोजन केलं जातंय. पण दक्षिण कोरियात झालेल्या एका संशोधनातून शाळेत समूह संसर्गाचा धोका असल्याचे निष्कर्ष समोर आलेत.

कोरोनाचा प्रभाव जरी कमी होत नसला तरीही देशाच्या अनेक भागात शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. पण जर शाळा आणि महाविद्यालयं सुरू केली तर कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका असल्याची धक्कादायक बाब दक्षिण कोरियात झालेल्या एका अभ्यासाद्वारे समोर आलीय. 

जानेवारी ते मार्च या दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या 5 हजार 706 रुग्णांच्या केसस्टडीज या अभ्यासासाठी तपासण्यात आल्या. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या 59 हजार 073 जणांच्या कोरोना चाचण्याही या अभ्यासासाठी करण्यात आल्या. त्याआधारे काढलेल्या निष्कर्षानुसार 10 वर्षांखालील वयोगटातील शालेय मुलांकडून संसर्गाचा धोका प्रौढांच्या तुलनेत कमी असतो. कारण प्रौढांच्या तुलनेत 10 वर्षांखालील मुलांच्या उच्छवासावाटे बाहेर पडणाऱ्या जंतुंचं प्रमाण कमी असतं. मात्र 10 ते 19 या वयोगटातील मुलांद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. 

यापुर्वीही युरोप आणि आशियामध्ये कोरोनाबाबत झालेल्या अभ्यासातून मुलांद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचे निष्कर्ष समोर आले होते. मात्र किशोरवयीन मुलांनाद्वारे संसर्गाचा व्यक्त केलेला धोका हा अधिक काळजी वाढवणारा आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतच्या नियोजनात सोशल डिस्टंन्सिंग आणि स्वच्छतेच्या इतर नियमांचं पालन करण्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. अन्यथा समूह संसर्गामुळे शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live