एनर्जी ड्रिंक्स' पिताय ? सावधान 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जून 2019

पुणे - तुम्ही ‘एनर्जी ड्रिंक्‍स’चे ‘टीन’ एका मागोमाग एक संपवताय? क्षणभर थांबा. कारण, त्यातून तुमचा रक्तदाब वाढून क्षणार्धात हृदयाचे कार्य थांबण्याचा धोका आता वाढतोय. वैद्यकीय संशोधनातून तज्ज्ञांनी हा धोका अधोरेखित केला आहे. 

पुणे - तुम्ही ‘एनर्जी ड्रिंक्‍स’चे ‘टीन’ एका मागोमाग एक संपवताय? क्षणभर थांबा. कारण, त्यातून तुमचा रक्तदाब वाढून क्षणार्धात हृदयाचे कार्य थांबण्याचा धोका आता वाढतोय. वैद्यकीय संशोधनातून तज्ज्ञांनी हा धोका अधोरेखित केला आहे. 

विशेषतः शहरांमधील पौगंडावस्थेतील आणि तरुण मुलांमध्ये ‘एनर्जी ड्रिंक’ पिणारा एक मोठा वर्ग आहे. या ड्रिंकमुळे आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते, असा विश्‍वास त्यांना वाटतो. कारण, या ड्रिंकमध्ये कॅफिन, टॉरीन अशा शरीराला उत्तेजित करणाऱ्या पदार्थांचे प्रमाण जास्त असते. या उत्तेजित पदार्थांचे प्रमाण हा विषय नेहमी वैद्यकीय तज्ज्ञांमधील वादाचा राहिला आहे. या पदार्थांमुळे शरीरातील रक्तदाब कमी वेळेत खूप वाढतो. त्याचा थेट परिणाम हृदयावर होण्याचा धोका असल्याचे संशोधनातून पुढे आल्याची माहिती डॉ. के. के. अग्रवाल यांनी प्रसिद्ध केली. एकाच वेळी दोनपेक्षा जास्त ‘एनर्जी ड्रिंक’चे टीन फस्त करणे, हे धोकादायक आहे. त्यातून हृदयाचे ठोके अनियमात होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे म्हणाले, ‘‘आपण घेत असलेल्या चहा-कॉफीपेक्षा चार ते पाच पट जास्त कॅफिन असते. थोड्या प्रमाणात पिले तर त्यातून उत्साह, तरतरी आल्यासारखे वाटते; पण ही पेये कमी वेळेत जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा वाईट परिणाम थेट हृदयावर होतो. रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, काही वेळा एनर्जी ड्रिंकचे कमी वेळेत खूप प्यायल्यास हृदयविकाराचे झटकेही आल्याची नोंद वैद्यकशास्त्रात झाली आहे.’’

‘‘एनर्जी ड्रिंक’चा हा धोका ओळखून युरोपीय युनियनने यावर काही काळासाठी बंदीदेखील घातली होती. याचे अतिसेवन हे हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असते. चहा-कॉफीमधून शरीरात जाणारे कॅफिन हे मर्यादित प्रमाणात असते, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

कॅफिनमुळे तात्पुरती ऊर्जा 
कॅफिनच्या प्रभावामुळे माणसाला तात्पुरती ऊर्जा मिळते. त्यातून माणूस हे पेय एकामागून एक घ्यायला लागतो. त्यातून आरोग्याला धोका निर्माण होतो. या बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहायक आयुक्त संजय शिंदे म्हणाले, ‘‘शीतपेयांमध्येही काहीअंशी कॅफेन असते; पण त्याला एक निश्‍चित प्रमाण ठरवून दिले आहे. शीतपेयांमध्ये १४५ ‘पार्टस पर मिलियन’पेक्षा (पीपीएम) जास्त नसावे; तर ‘एनर्जी ड्रिंक’मध्येही कॅफेनला ३२० पीपीएम परवानगी दिली आहे.’’


संबंधित बातम्या

Saam TV Live