लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी, पेरणीच्या तोंडावर बियाण्यांचे दर गगनाला

साम टीव्ही
शनिवार, 27 जून 2020
  • लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी 
  • पेरणीच्या तोंडावर बियाण्यांचे दर गगनाला
  • बियाणांच्या दरात दीडपट वाढ 

शेतकऱ्यांच्या मागचं शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनचं संकट आणि त्यात बियाण्यांचे भरमसाठ वाढलेले दर यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.

कोरोना संसर्गाचं संकट घोगावत असतानाच आता शेतकऱ्यांसमोर नवं आर्थिक संकट उभं ठाकलंय. बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाण्यांच्या दरात भरमसाठ वाढ केलीय. पेरणीच्या तोंडावरच ही दरवाढ केल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालीय. बाराशे रुपयांना मिळणारी कांदा बियाणांची एक किलोची पिशवी आता बावीसशे रुपयांना मिळतेय. आधीच शेतमालाला उठाव नाही आणि त्यात ही अशी दरवाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. 

खरिप हंगामात बाजरी, उडीद, वाटाणा, कपाशी, कांदा या पिकांच्या पेरण्या प्रामुख्याने केल्या जातात. पण, या पिकांची बियाणं अव्वाच्या सव्वा दरात विकली जातायत. 

गेल्या वर्षी ११०० रुपयांना मिळणारी कांदा बियाण्यांची एक किलोची पिशवी आता २२०० रुपयांना मिळतेय. बाजरीच्या दीड किलोच्या पिशवीला गेल्या वर्षी ३०० ते ४०० रुपयांचा दर होता तो यंदा ५०० ते ६०० रुपयांवर पोहोचलाय. मुगाच्या पाच किलोच्या पिशवीचा दर गेल्या वर्षी ११०० ते १२०० रुपये होता, तो यंदा १३८० ते १४०० रुपये झालाय. मक्याच्या बियाण्याला गेल्या वर्षी ५ किलोसाठी ४५० रुपये इतका दर होता, तर तो यंदा ६५० रुपयांवर पोहोचलाय. उडीदाच्या बियाण्यांची पाच किलोची पिशवी गेल्या वर्षी १००० ते ११०० रुपयांना मिळायती ती यंदा १२०० ते १३०० रुपयांना मिळतेय. कपाशीच्या बियाण्याची एक किलोची पिशवी गेल्या वर्षी ५०० ते ६०० रुपयांना मिळायची, त्यासाठी यंदा ७०० ते ७५० रुपये मोजावे लागतायत. तर सोयाबीनच्या बियाण्यांची ३० किलोची पिशवी गेल्या वर्षी १६०० रुपयांना मिळायची तिचा दर यावर्षी २२५० रुपयांवर पोहोचलाय. 
लॉकडाऊनमुळे बियाणे उत्पादक कंपन्यांचं नियोजन पार कोलमडलंय. फेब्रुवारी-मार्च महिन्यात कंपन्या बियाणांचं पॅकिंग करतात. पण, यंदा पॅकिंगसाठी मजूरच मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वांना बियाणं पुरवठा करणं शक्‍य नसल्यानं दीडपट किमती वाढवल्याचा दावा कंपन्यांनी केलाय. दरम्यान, बियाणांच्या आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसे कृषीसेवा केंद्र चालकांनी घेतल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशारा कृषी खात्यानं दिलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live