वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली. निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सात गडी राखून सहज मात केली. कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकण्याचा पराक्रम कोहलीच्या संघाने करून दाखवला. 

मेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली. निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सात गडी राखून सहज मात केली. कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकण्याचा पराक्रम कोहलीच्या संघाने करून दाखवला. 

युझवेंद्र चहलच्या भेदकतेमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला 230 धावांमध्येच गुंडाळले. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरवात संथ झाली. रोहित शर्मा (9) आणि शिखर धवन (23) हे दोघे लवकर बाद झाले. त्यानंतर कोहली आणि महेंद्रसिंह धोनीची जोडी जमली. या दोघांनी 82 चेंडूंत 54 धावांची भागीदारी केली. धावगती उंचावण्याच्या प्रयत्नांत कोहली बाद झाला. त्याने 46 धावा केल्या. 

तोपर्यंत धोनीची खेळपट्टीवर नजर बसली होती. धोनीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवित भारताला विजयाच्या दिशेने नेले. तीन सामन्यांच्या मालिकेत धोनीने सलग तिसरे अर्धशतकही झळकाविले. त्याला केदार जाधवनेही भक्कम साथ देत 'भारताचा नवा फिनिशर कोण' या प्रश्‍नाचं ठोस उत्तर संघ व्यवस्थापनाला दिले. 

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यासाठी भारताने संघात तीन बदल केले. अंबाती रायडू, महंमद सिराज आणि कुलदीप यादव यांच्याऐवजी केदार जाधव, विजय शंकर आणि चहलला संधी देण्यात आली. 

चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. निर्णायक तिसऱ्या सामन्यासाठी त्याला स्थान मिळाले आणि मग त्याने स्वत:ची उपयुक्तता दाखवून दिली.. दहा षटकांमध्ये केवळ 42 धावा देत त्याने सहा गडी बाद केले. 

भुवनेश्‍वर कुमारने दोन्ही सलामीवीरांना स्थिरावण्याची संधीही दिली नाही. ऍलेक्‍स केरी आणि ऍरॉन फिंच या दोघांनाही त्याने पहिल्या नऊ षटकांमध्येच पॅव्हेलियनमध्ये परत धाडले होते. शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजाने तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. केदार जाधवच्या गोलंदाजीवर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण दुसरीकडून चहलने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करण्याचा सपाटा सुरू केला. 

महेंद्रसिंह धोनीच्या चपळ यष्टिरक्षणामुळे मार्श बाद झाला. त्यानंतर ख्वाजा चहलकडेच झेल देऊन बाद झाला. पीटर हॅंड्‌सकोम्बने अर्धशतक करत एकाकी लढत देण्याचा प्रयत्न केला. त्याला इतरांकडून साथ लाभली नाही. 

भारताकडून चहलने सहा, तर भुवनेश्‍वर आणि महंमद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. 


संबंधित बातम्या

Saam TV Live