भारतात येत्या शंभर दिवसात 5G ची चाचणी..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 जून 2019

एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी कंपन्यांचे आरोग्य चांगले राहणे हे देशहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. याच वेळी त्यांनी व्यावसायिक होण्याची गरज आहे. त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मी प्रयत्न करेन. - रविशंकर प्रसाद, केंद्रीय दूरसंचारमंत्री
 

नवी दिल्ली - भारतात चालू वर्षात ५ जी आणि इतर बॅंडच्या स्पेक्‍ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती नवनियुक्त केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी दिली. सरकारी मालकीच्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या कंपन्यांच्या पुनरुज्जीवनास माझे प्राधान्य राहणार आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, की दूरसंचार कंपन्यांनी व्यावसायिक आणि सहकार्याची भूमिका कायम ठेवावी.

चालू वर्षात ५ जी स्पेक्‍ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे. देशात ५ जी चाचणी पहिल्या शंभर दिवसांत करण्यास माझे प्राधान्य राहील. तसेच, देशभरात पाच लाख वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात येतील. याचबरोबर दूरसंचार उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रावर भर देण्यात येईल.  भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ८ हजार ६४४ दूरसंचार लहरींच्या लिलावाची शिफारस केली आहे. यात ५ जी सेवेचाही समावेश आहे. यासाठी आधार किंमत ४.९ लाख कोटी रुपये ठरविण्यात आली आहे. 

आर्थिक संकटातील दूरसंचार क्षेत्राने ही किंमत परवडण्याजोगी नसल्याची तक्रार केली आहे. यावर प्रसाद म्हणाले, की ‘ट्राय’ने शिफारस केलेली आहे. यावर संसदेची स्थायी समिती, वित्त समिती विचार करतील. त्यानंतर मंत्रिमंडळ यावर निर्णय घेईल. 

एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी कंपन्यांचे आरोग्य चांगले राहणे हे देशहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. याच वेळी त्यांनी व्यावसायिक होण्याची गरज आहे. त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मी प्रयत्न करेन. - रविशंकर प्रसाद, केंद्रीय दूरसंचारमंत्री
 


संबंधित बातम्या

Saam TV Live